Search This Blog

Wednesday, 7 January 2026

शिंगाड्याच्या पिठाची शेंगदाणा भजी

 

शिंगाड्याच्या  पिठाची शेंगदाणा  भजी



शिंगड्याच्या पिठात लाल मिरचीचे  तिखट, मीठ, जिरे पावडरआणि कच्चे शेंगदाणे घालून थोडे थोडे पाणी शिंपडून भिजवायचे. दाणे मोकळे पण पिठात घोळत एक एक सुट्टा दाणा मंद आचेवर तळून काढावा. थंड झाला  की कुरकुरीत भजे  तयार.

Thursday, 1 January 2026

#२०२६_चा_पहिला_नाष्टा #झणझणीत_तर्री_पोहे_मिसळ

 #२०२६_चा_पहिला_नाष्टा

आज नव्या वर्षांचा पहिला दिवस !
सकाळी मनात आले की आज नाष्ट्याला काहीतरी झणझणीत खावं .
मग आम्ही दोघेही आमच्या सदाशिव पेठेतील घराशेजारच्या पुणे विद्यार्थी गृहा जवळच्या नृसिंह मंदिरा समोर असलेल्या ‘#सुदाम्याचे_पोहे’ मधून तर्री पोहे घेऊन आलो.
अतुलने (मुलगा) मुंबईहून आणलेले फरसाण शिल्लक होतेच.
सौ. ने कांदा व कोथिंबीर चिरली.
अशी सगळी तयारी झाल्यावर एका स्टीलच्या बाऊलमध्ये अगोदार पोहे घातले. त्यावर फरसाण घातले. त्यावर चिरलेला कांदा आणि कोथिंबीर पसरली. सगळ्यात शेवटी त्याच्यावर गरमागरम झणझणीत तर्री घातली. मला आवडते म्हणून मलईदार कवडीचे दही घालून झणझणीत पोहे-फरसाण-तर्री-दही मिसळीचा आस्वाद घेत २०२६ मधला पहिला आवडता नाष्टा केला.
ता. क. : मला मिसळी सोबत पाव खायला आवडत नाही.

#उडीद_डाळीची_कुरकुरीत_जाळीदार_भजी


 #उडीद_डाळीची_कुरकुरीत_जाळीदार_भजी



फक्त उडदाची डाळ घालून बनवा हा कुडुम ... भिजवलेल्या उडीद डाळीची भजी एकदम कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी.
उडदाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी उडीद डाळ भिजवून, वाटून, त्यात कांदा,हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, जिरे, मीठ घालून मिश्रण तयार करतात आणि गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळतात, ज्यामुळे कुरकुरीत आणि पौष्टिक भजी तयार होतात, जी हिरव्या चटणीसोबत खूप छान लागतात. यासाठी डाळ रात्रभर किंवा ४-५ तास भिजवून कमी पाण्यात वाटणे आणि ही भजी तेलात सोडताना हाताला तेल लावणे खूप आवश्यक व महत्त्वाचे आहे.
साहित्य:
उडदाची डाळ ( एक रात्र भिजवलेली)
कांदा (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
आले (किसलेले किंवा ठेचलेले)
कोथिंबीर (बारीक चिरलेली)
ओवा
जिरे
मीठ
तांदळाचे पीठ (ऐच्छिक, कुरकुरीतपणासाठी)
हिंग (ऐच्छिक)
कढीपत्ता (ऐच्छिक)
मोहरी (ऐच्छिक)
तळण्यासाठी तेल .
कृती:
डाळ भिजवणे आणि वाटणे: उडद डाळ ४-५ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. नंतर पाणी काढून टाका आणि मिक्सरमध्ये कमीत कमी पाणी वापरून जाडसर वाटून घ्या. मिश्रण जास्त पातळ नसावे.
मिश्रण तयार करणे: वाटलेल्या डाळीत चिरलेला कांदा, मिरची, आले, कोथिंबीर, ओवा, जिरे, मीठ आणि तांदळाचे पीठ (घालत असल्यास) घालून चांगले फेटून घ्या, जेणेकरून मिश्रण हलके होईल.
भजी तळणे: कढईत तेल गरम करा. बोटांना किंवा चमच्याला तेल लावून मिश्रणाचे छोटे गोळे किंवा वडे तेलात सोडा आणि मध्यम आचेवर सोनेरी-तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
सर्व्ह करणे: तयार भजी गरम गरम हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
साहित्य- २ वाटी उडीद डाळ, २ टेबल स्पून रवा, १ टी
स्पून हळद, २ टी स्पून लाल मिरची पावडर, १/२ टी स्पून धना पावडर, १/२ टी स्पून जिरा पावडर, १/२ टी स्पून गोडा मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, पाणी
चटणीसाठी साहित्य:-
१/२ वाटी खवलेला ओला नारळ, ३-४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ४-५ लसूण पाकळ्या, २ टी स्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि साखर, वाटण्यासाठी पाणी.
कृती- आदल्या दिवशी रात्री उशीरा उडीद डाळ धुऊन भिजत घाला. दुसऱ्या दिवशी ती डाळ वाटून घ्यावी. वाटलेली डाळ एका पसरट भांड्यात काढून त्यात हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गोडा मसाला, रवा, बारिक चिरलेली कोथिंबीर, गरम तेल, चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्यावं. गॅसवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावं. त्या गरम तेलात वरील एकत्र केलेल्या मिश्रणाची भजी तळून घ्यावी.
चटणीसाठी कृती- खवलेल्या ओल्या नारळात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर आणि पाणी घालून मिक्सरमधून चटणी वाटून घ्यावी.