आज सकाळच्या नाष्ट्याला काय करावे ? असा विचर करतांना फ्रीजमध्ये काय शिल्लक आहे ते पहात असतांना ,दोन उकडलेले बटाटे दिसल्यावर यांचा वापर करुन काहीतरी करावे असे ठरवून ते दोन उकडलेले बटाटे बाहेर काढून ठेवले.
मग त्यांचे पराठे करू या असे म्हणताच पत्नीने सांगितले की गेल्याच आठवड्यात आपण बटाट्याचे पराठे केले होते,तेंव्हा आता दुसरे काहीतरी करू या.
मग थोडा विचार करून अखेर दोघांनी एकमताने ठरवले की ,आज आपण बटाट्याच्या पुऱ्या आणि चटणी करू या.
साहित्य : ३-४ मध्यम आकाराचे बटाटे,एक वाटी चाळलेली कणीक, अर्धी वाटी बेसन पीठ (चणा डाळीचे पीठ), चवीनुसार मीठ,चिमूटभर हळद,एक छोटा चमचा लाल तिखटाची पावडर,एक चमचा जिरे पूड,एक चमचा तीळ,एक छोटा चमचा ओवा,अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,एक चमचा आले-लसूण-हिरव्या मिरचीचा ठेचा,पाव वाटी ताजे घट्ट मलईचे दही.
कृती : प्रेशरकुकरमधून बटाटे उकडून घ्यावेत.कुकरमधून काढल्यावर सोलून गरम असतानाच बटाट्यांचा पूरणयंत्रावर लगदा करून ठेवा किंवा किसणीवर किसून ठेवा.
एका परातीत हा बटाट्याचा लगदा किंवा कीस घेऊन त्यात कणिक, बेसनपीठ , हळद,लाल तिखटाची पावडर, मीठ ,आले-लसूण-हिरव्या मिरच्यांचा ठेचा, जिरेपूड, तीळ,ओवा,मलईचे घट्ट ताजे दही घालावे व लागेल तसे पाणी घालून पुर्यांसाठी घट्ट पीठ मळावे.तेलाचे मोहन घालून पुन्हा मळावे. मुरण्यासाठी १५-२० मिनिटे ओल्या सूती कपड्याने झाकून बाजूला ठेवावे. १५ मिनिटांनी कपडा काढून पुन्हा एकदा पीठाला तेलाचा हात लावून कणिक मळतो तसे मळून घ्यावे. परातीला पीठ चिकटता कामा नये.
या मळून घेतलेल्या पिठाचे लिंबाएव्हढे गोळे करून ठेवावेत. एकेक गोळा लाटून बेताच्या आकाराच्या पुर्या लाटून तळावे व आपल्याला आवडत्या लोणचे किंवा, चटणी बरोबर सर्व्ह करा
No comments:
Post a Comment