Monday 8 September 2014

आठवणींच्या गंधकोषी - माझे पूज्य गुरुजन - नन्ना भिडे सर

आठवणींच्या गंधकोषी - माझे पूज्य गुरुजन - नन्ना भिडे सर 

न.ना.भिडे : शाळेत इयत्ता ९ वी मध्ये आम्हाला संस्कृत विषय शिकवण्यासाठी नागपूरचे एक नवीन शिक्षक शाळेत आले होते,त्यांचे नांव होते.नरहरी.नारायण.भिडे.तथा नन्ना भिडे. अत्यंत बुद्धिमान,वयाने ५० चे पुढे,ऊची ५’-”,अत्यंत बोलके व भावुक असे डोळे,तेजस्वी व हसरा चेहरा,गुलाबी गौर वर्ण,असे त्यांचे वर्णन करता येईल.स्वच्छ पांढरे शुभ्र दुटांगी धोतर, सूती पांढराच शर्ट, त्यावर क्रीम कलरचा कोट, भव्य कपाळावर केशरी गंध,डोक्यावर काळी टोपी,पायात चामड्याचा कोल्हापुरी वहाणा असा त्यांचा वेष असे.ते संघाचे निस्सीम कार्यकर्ते होते.सरसंघचालक मा.मा.स. गोळवलकर गुरुजींचे ते निकटवर्ती होते. आजही संघाचे प्रत्येक शाखेत / सराव शिबिरांत सुरूवातीस ध्वजासमोर उभे राहून ध्वजाला नमन करून जी संस्कृत प्रार्थना म्हटली जाते ती प्रार्थना त्यांनी प्रथम १९३७ मध्ये संस्कृतमध्ये लिहिली आहे हे फार थोड्या लोकांना माहिती असेल.  
वर्गात अतिशय तन्मयतेने,साध्या,सोप्या भाषेत सर्वांना कळेल अशा पद्धतीने विषय शिकवण्याची त्यांची हातोटी खरोखरच वाखाणण्यासारखीच होती,त्यामुळेच अल्पावधीतच ते विद्यार्थ्यांत खूपच आवडते शिक्षक झाले. केवळ संस्कृत नव्हे तर संस्कृत खेरीज इतर अनेक विषयांवरही त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे जे बौद्धिक प्रबोधन केले त्यास तोड नाही.खास करून रामायण,महाभारत अशा पौराणिक,अध्यात्म,तत्वज्ञान असे विषय किंवा परंपरा व सामाजिक रूढी अगर देव/ ईश्वर ह्या संकपल्पनेवर त्यांनी आम्हाला जे मूलगामी ज्ञान दिले त्याचा त्यावेळी आमच्या मनावर खोलवर जो ठसा ऊमटला तो आजही पुसला गेलेला नाही.

११ वीत अशोक परांजपे, अनिल खारकर व आनंद म्हसकर स्पेशल संस्कृत शिकायला श्री भिडे       गुरुजींकडे जात असत. त्यांचेपैकी आनंद म्हसकरला जगन्नाथ शंकरशेत शिष्यवृत्ती मिळाली होती. 

No comments:

Post a Comment