Search This Blog

Sunday, 15 February 2026

रताळ्याचं दहीचाट

 #रताळ्याचं_दहीचाट

 


रताळ्याचं दही चाट नक्की करून बघा. खमंग परतलेले रताळे, घट्टसर दही, गोड-तिखट चटणी आणि कुरकुरीत टॉपिंग —

उपवासाच्या फराळासाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन!

उपवासात हलकं आणि समाधान देणारं काहीतरी हवं असेल तर हे नक्की करून बघा.

साहित्य :

एक  मध्यम आकाराचे  रताळे  

एक उकडलेला बटाटा

अर्धा लिटर घट्ट घरगुती दही

१ चमचा तिखट

½ चमचा जिरेपूड

चवीनुसार मीठ

२–३ चमचे साजूक तूप

आंबट- गोड चटणी:

चिंचेचा कोळ

खजूर

गूळ

हिरवी चटणी:

कोथिंबीर

कच्चे शेंगदाणे

हिरवी मिरची

मीठ

 दह्यासाठी:

२ चमचे साखर

चिमूटभर मीठ

टॉपिंग म्हणून  क्रंचसाठी:

बटाट्याच्याचे फिंगर  चिप्स आणि वेफर्सचा चुरा

कृती

रताळी उकडून घ्या. सालं  काढून तुकडे करा.बटाटा सोलून ट्याचेही तुकडे करून घ्या.

तव्यावर साजूक तूप गरम करून रताळ्याचे व बटाट्याचे तुकडे ४–५ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या.मग त्यात तिखट, जिरेपूड आणि मीठ घालून कुरकुरीत होईपर्यंत परता.

हे मसालेदार रताळ्याचे व बटाट्याचे तुकडे नुसते तसेच खाल्ले तरी सुद्धा छान लागतात बरका !

एका बाऊलमध्ये दही घेऊन  त्यात मीठ, साखर व थोडेसे पाणी घालून रवीने छान घुसळा.

आपण इडली वडा सांबार साठी वापरतो त्या स्टीलच्या डिशमध्ये ते दही ओता.

वरून चिंच-खजूर-गुळाची गोड चटणी आणि हिरव्या चटणीचे थेंब घालून हलकं डिझाईन तयार करा मधोमध मसालेदार रताळ्याचे तुकडे ठेवा.कडेनी चिमूटभर तिखट पेरा.शेवटी बटाट्याचे फिंगर  चिप्स  आणि वेफर्सचा चुरा घालून सर्व्ह करा.

रताळं प्रमाणात खाल्लं तर पोटाला हलकं आणि नीट पचतं आणि उपवास सुखकारक होतो.

तळलेले जड पदार्थ टाळून असा हलका, खमंग आणि समाधान देणाराउपवसाचा फराळ एकदा करून बघाच.

आज महाशिवरात्र म्हणून मी सकाळी नाष्ट्यासाठी मुद्दाम ही डिश बनवली आहे.