आज सकाळी फ्रीज उघडल्यावर दोन कारली दृष्टीस पडली. आणि मनात आले की आज यांचाच वापर करावा आणि डावीकडे तोंडिलावणे म्हणून कारल्याचे पंचामृत बनवावे.
त्याचीच ही सचित्र रेसीपी मी आज येथे तुमच्या सोबत शेअर करत आहे.
साहित्य : दोन मध्यम आकाराची कारली , पाव वाटी गोटा (सुक्या) खोबर्याचे पातळ काप , अर्धी वाटी पांढरे तीळ , अर्धी वाटी शेंगदाण्याचे भरड कूट (अर्धेगोबडे) ,अर्धी वाटी चिंचेचा कोळ काढून , चवीनुसार ५ – ६ हिरव्या मिरच्या , ८-१० कढी पत्त्याची पाने , गुळाचा एक मोठ्ठा खडा , चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल,मोहोरी,हळद व हिंग
कृती : प्रथम बिया काढून कारली बारीक चिरून व धुवून घट्ट पिळून घ्यावीत. नंतर गॅसवर एका कढईत तेल गरम करून घ्या व तेलाची हिंग, हळद,मोहरी, कढीलिंब घालून तडका फोडणी करा आणि त्यात बारीक चिरलेली कारली व पाणी घालून चांगले शिजवून घ्या. मग चिंचेचा कोळ,तिळाचे कूट, दाण्याचे कूट व खोबऱ्याचे काप शिजत आलेल्या कारल्यात घालावेत. नंतर त्यात चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे मीठ व गूळ घालावा. चांगले शिजल्यावर कारल्याचे पंचामृत तयार होते.