Monday, 11 November 2024

शिळ्या पोळ्या आणि भात यांचे खुसखुशीत वडे/पुऱ्या


 शिळ्या पोळ्या आणि भात यांचे खुसखुशीत वडे/पुऱऱ्या 



साहित्य : दोन शिळ्या पोळ्या,एक वाटीभर शिळा भात,दीड वाटी बेसन पीठ,अर्धी वाटी तांदूळाची पिठी,दोन डाव भरून थालिपीठाची भाजणी, चवीनुसार लाल तिखट व मीठ,एक चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, एक चमचा पांढरे तीळ , दोन चमचे तेलाचे मोहन , वडे तळणीसाठी गरजेनुसार तेल. 

कृती : प्रथम कात्रीने पोळ्या चिरून त्यांचे  बारीक  बारीक काप  करून घ्या. एका मोठ्या बाऊलमध्ये भात घेऊन तेलाच्या हाताने भात मोकळा करून घ्या.  त्यात पोळ्यांचे चिरलेले बारीक काप घाला,बेसन पीठ,भाजणी आणि तांदूळाची पिठी घाला. चवीनुसार लाल तिखट पावडर,मीठ घाला. चाट मसाला,आमचूर पावडर,पांढरे तीळ घालुन सगळे चांगले कुस्करून कोरडेच मिक्स करून घ्या. आता त्यात  अर्धी वाटी पाणी घालून दोन चमचे तेलाचे मोहन घालून ,कणिक मळतो तसे घट्ट मळून घ्या. मळतांना मधून मधून गरजेप्रमाणे थोडे थोडे  तेलाचे मोहन घाला. 

खूप मळलेला पिठाचा घट्ट  गोळा छान  मुरण्यासाठी १५ -२० मिनिटे झाकून ठेवा. 


दुसरीकडे गॅसवर एका कढईत वडे तळणीसाठी तेल तापत ठेवा. 

२० मिनिटांनी मुरलेला पिठाचा गोळा पुन्हा एकदा  छान मळून घेऊन त्यांचे लिंबा एव्हढे गोळे बनवून ठेवा. एकेक गोळा  पोळपाटावर पोळ्यांसारखा लाटून त्यातून छोट्या  नैवेद्याच्या वाटीचा वापर करून छोटे छोटे गोल वडे /पुऱ्या कापून  घ्या. 

तेल चांगले कडकडीत तापले असेल तर मध्यम आंचेवर त्या तेलात वडे/पुऱ्या  सोडून गोल्डन सोनेरी रंगावर तळून काढा. 

खुसखुशीत वडे/पुऱ्या लोणी ,गोड दही किंवा कैरीचे लोणचे अथवा खाराची मिरची यांच्या सोबत सर्व्ह करा.जेवणात डावीकडचे तोंडीलावणे  म्हणून सुद्धा हे वडे/पुऱ्या  कामी येतील.