Saturday 18 January 2020

सोलाणा हरभर्‍याची आमटी


सोलाणा हरभर्‍याची आमटी 


सोलाणा हरभरे छानपैकी तेलावर परतून व वाफेवर शिजवून घ्यायचे आणि नंतर त्यात आवडीनुसार कांदा,लसूण, हिरवी मिरची,जिरे,सुके खोबरे तेलावर परतून घेऊन एकत्र  मिक्सरवर वाटून  फोडणीला टाकायचे आणि उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचे. वाटण शिजलेसे वाटले की गॅस बंद  करून बारीक चिरलेली कोथिंबिर घालून वर झाकण म्हणून ताट ठेवून द्या.
आमटी झाली.आता आमटीबरोबर भाकरीच हवीच , शिवाय  खर्डा तर हवाच हवा.असा हरभर्‍याची आमटी,खर्डा, फोडलेला कांदा,घरचं दही,पंचपक्वानाला मागे सारेल असा चटपटीत आणि फर्डा बेत .

Thursday 16 January 2020

पावाच्या खुसखुशीत वड्या

  1. #पावाच्या खुसखुशीत #वड्या


साहित्य : शिळ्या (पांढर्‍या) पावाच्या १०-१२ स्लाइस , एक वाटी साखर , चिमुटभर बेकिंग पावडर , २-३ वेलदोड्यांची पूड, अर्धा कप दुध, एक टेबलस्पून दुधाची पावडर , एक टेबलस्पून साजूक तूप, ८-१० काजूचे तुकडे व बेदाणे
कृती : शिळ्या ब्रेडच्या स्लाईसेसचा बारीक चुरा करुन त्यात साखर, बेकिंग पावडर , वेलदोड्यांची पूड, दुधाची पावडर मावेल एव्हढं दुध घालून मिक्स करा व दोन तास मुरत ठेवा,म्हणजे साखर विरघळेल.
स्टीलच्या थाळ्याला हाताने साजूक तूप लावून त्यावर हे मिश्रण थापा. वरून काजूचे तुकडे किंवा बेदाणे लावा.
थाळा गॅसवर ठेवा. वर झाकण ठेवून गॅसच्या मंद आंचेवर १०-१५ मिनिटं खरपूस भाजा.
थंड झालं की वड्या पाडा आणि घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.

Friday 10 January 2020

पॅशनफ्रुटचे सरबत


पॅशनफ्रुटचचं सरबत खूपच सुंदर बनत. पिकलेल्या फळाचा गर काढून तो पाण्यात टाकावा. चांगल ढवळून मिक्स झालं की गाळून त्यात चवीप्रमाणे साखर , सेंधव मीठ, मिरपूड टाकावी. बाटलीत भरून फ्रीझ मध्ये ठेवलं तर खूप दिवस टिकतं. चवीला आंबट-गोड व सुंदर सुगंध येतो. करून पहा. या सरबतात व्हिटामिन व इतर मिनरल असतात.

Tuesday 7 January 2020

कडंगुळे


कडंगुळे 




साहित्य : दीड वाट्या कणीक,पाव वाटी ज्वारीचे पीठ,अर्धी वाटी बेसन, ४-५ हिरव्या मिरच्या,७-८ लसणाच्या पाकळ्या,एक चमचा जिरे,अर्धा चमचा ओवा,अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ,एक छोटा चमचा हळद,आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल व पीठ भिजवण्यासाठी गरजेनुसार पाणी.
कृती : प्रथम मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात हिरव्या मिरच्या +लसणाच्या पाकळ्या+जिरे+ओवा घालून वाटून घ्या. वाटण एका छोट्या बाउलमध्ये काढून ठेवा. आता एका मोठ्या बाउलमध्ये कणीक घेऊन त्यात ज्वारीचे पीठ व बेसन एकत्र करा. आता त्यात मिक्सरवर वाटलेले वाटण +हळद+चवीनुसार मीठव बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घेऊन मग जरूरीप्रमाणे थोडे थोडे पाणी घालत पीठ मळून घ्या आणि १०-१५ मिनिटे मुरत ठेवा. १५ मिनिटांनी  तेलाच्या  हाताने पुन्हा एकदा पीठ चांगले छान मळून घेऊन त्याचे मोठाले गोळे बनवून घ्या. एकेक गोळा सगळीकडून तेलाचा हात लावून पोळपाटावर ठेऊन जरासा  जाडसर लाटून घेऊन घ्या आणि पुरीच्या आकाराचे एखादे स्टीलच्या डब्याचे झाकणाने त्यातून बसतील तेव्हध्या पुर्‍या कापून काढा.
आता गॅसवर एका कढईत पुर्‍या तळण्यासाठी तेल तापत ठेवा. तेल चांगले कडकडीत तापले की त्यात पुर्‍या सोडा आणि तळून काढा.
हे खुसखुशीत कडंगुळे ५-६ दिवस छान टिकतात . त्याउले प्रवासात न्यायला उत्तम .



Wednesday 1 January 2020

लसूणी मेथी राईस

लसूणी मेथी राईस

साहित्य : दोन वाट्या दिल्ली राईस,चार वाट्या पाणी,एक छोटा चमचा हळद , एक जुड्डी स्वच्छ धुवून , निवडून व बारिक चिरलेली हिरवी मेथी ,एक मध्यम आकाराचा कांदा , ८-१० लसणाच्या पाकळ्या किंवा लसणाची चिरलेली पात ,मूठभर कोवळे मटार दाणे,१०-१२ काजू पाकळ्या,चवीनुसार मीठ.

फोडणीसाठी साहित्य : एक छोटा चमचा मोहरी,एक छोटा चमचा जिरे ,चिमूटभर हींग एक छोटा चमचा हळद,७-८ कढीपत्त्याची पाने ,डावभर तेल.
मसाले : एक छोटा चमचा चमचा लाल मिरचीची पावडर ,एक छोटा चमचा गरम मसाला, एक छोटा चमचा जिरे पूड ,एक छोटा चमचा धणे पूड.
कृती :प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि अर्धा तास पाण्यात भिजत घालून ठेवा.

दुसरीकडे गॅसवर एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा आणि पाण्याला उकळी आली की लगेचच मीठ व भिजवलेले तांदुळ घालून मोकळा भात बनवून घ्या.

आता गॅसवर एका जाड़ बुडाच्या पातेल्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घाला ती तडतडली की लगेच जिरे,चिमूटभर हिंग व कढीपत्त्याची पाने घाला.नंतर लगेच उभा चिरलेला कांदा व लसणाच्या बारीक़ चिरलेल्या पाकळ्या,मटारचे दाणे आणि काजुच्या पाकळ्या घालून लालसर होईपर्यंत परताव्या.

गुलाबीसार रंगावर कांदा परतून झाला की बारिक चिरलेली मेथी आणि लसणाची चिरलेली पात घालून तेल सुटेपर्यंत परतावी.

शेवटी शिजवलेला तयार भात घालून परतावे.पॅनवर

झाकण ठेवून मिनिटे मंद गॅसची आंच मंद ठेवून १०-१५ मिनिटे भात शिजू दयावा.

सर्व्हिंग बाउल मध्ये लसूणी मेथी राईस काढून घेऊन त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरुन एखाद्या कोशिंबीरीसोबत सर्व्ह करा.