Wednesday 28 August 2019

सत्यनारायण प्रसादाचा शिरा




साहित्य : सव्वा वाटी बारीक रवा , सव्वा वाटी साखर,सव्वा वाटी साजूक तूप ,सव्वा वाटी दूध , सव्वा केळे , सव्वा छोटा चमचा विलायची पावडर ,दुधात खालून केशर ,८-१० बेदाणे व काजुच्या पाकळ्या

कृती : गॅसवर एका फ्लोराच्या नॉनस्टिक पातेल्यात किंवा कढईत दोन-तीन चमचे साजूक तुप घालून ते गरम झाल्यावर रवा टाका व उलथन्याने किंवा झार्‍याने सोनेरी रंगावर भाजून घ्या, मग त्यात दूध घालून शिजवून घ्या, मग त्यात उरलेले साजूक तूप व साखर घालून ढवळून घ्या, आता त्यात सव्वा केळे कुस्करून घाला , विलायची पावडर,केशर व ड्राय फ्रूट्स (बेदाणे आणि काजू पाकळ्या) घालून झार्‍याने हलवून एकजीव करून घेऊन झाकण ठेऊन एक वाफ काढून घ्या व गॅस बंद करा. पांच मिनिटांनी झाकण काढा.

प्रसादाचा झुणका (गजानन महाराजांच्या प्रकट दिना साठी खास केला जाणारा)


प्रसादाचा झुणका
(गजानन महाराजांच्या प्रकट दिना साठी खास केला जाणारा)


साहित्य : दोन वाट्या  बेसन (चणा डाळीचे पीठ) , अर्धी वाटी शेंगाण्याचे तेल , ८-१० कढीपत्त्याची पाने,चवीनुसार मीठ
आवडीनुसार लाल मिरचीचे तिखट,फोडणी साठी एक चमचा मोहरी,एक छोटा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धी वाटी पाणी.
कृती :  प्रथम गॅसवर एका कढईत तेल घालून ते छान गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यानंतर त्यात हिंग हळद घाला नंतर कढीपत्त्याची पाने  घाला . आता त्यात बेसनाचे पीठ  घालून चांगले खमंग परतुन घ्या. नंतर त्यात आवडीनुसार लाल मिरचीचे तिखट व चवीनुसार मीठ घालून थोडे परता . शेवटी  त्यावर पाण्याचा हबका मारून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि कढईवर झाकण ठेवून  चांगली वाफ आणा आणि भाकरी बरोबर हा गजानन महाराजांचा प्रसाद सर्व्ह करा.

झटपट पिझ्झा ऊत्तपम..


झटपट  पिझ्झा ऊत्तपम..

काही विषेअवघड नाही एकदम सोप्पा आहे बनवायला ...
काल संध्याकाळी माझी काही मित्रमंडळी येणार होती म्हणून ईडली सांबरचा प्रोग्रॅम केला होता. फ्रिजमध्ये त्याचे पीठ शिल्लक उरले होतेच.  मग आज सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन फ्रीज मधे ठेवलेल पिठ बाहेर काढलं आणि त्याच पिठांत  फ्रिजमध्ये उपलब्ध होत्या त्या सगळ्या भाज्या बारीक चिरून टाकल्या. भाज्या म्हणजे सिमला मिरच्या ,कोबी,फ्लॉवरचे तुरे ,कांदा ,टोमॅटो ई. मग त्यातच थोडी ठेचलेली मिरची , मीठ ,मीर पूड सगळ मिक्स केलं आणि दोन्हीही बाजूंनी  तेल टाकून लाल सर रंगावर भाजून घेतलं .... वरून मग फक्त रेड चीली फ्लेक्स टाकायची . खातांना वरून परत ओरेगँनो टाकून खायच खूपच मस्त लागतं. सोबत दहयातली ओले खोबरे व पंढरपूरी डाळ्याची चटणी . असा हा झटपट पिझ्झा उत्तपम ...

Tuesday 27 August 2019

चटकदार डांगर

चटकदार डांगर



साहित्य : दोन वाट्या तांदूळ,एक वाटी उडदाची डाळ,अर्धी वाटी चणा (हरभरा) डाळ,अर्धी वाटी धने,दोन चमचे जिरे,८ – १० सुक्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ व छोटा चमचा हळद व हिंग.

कृती : प्रथम गॅसवर एका कढईत तांदूळ,उडदाची डाळ,चणा डाळ ,धने व जिरे स्वतंत्रपणे खरपूस भानून घ्या,थोड्या तेलावर सुक्या लाल मिरच्याही भाजून घ्या व हे सर्व भाजकलेले पदार्थ हळद,हिंग व मीठ घालून मिक्सरमधून बारीक दळून घेऊन थंड झाल्यावर चाळून घ्यावे व एका घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत अथवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.

डांगर करावयाची कृती : जेवतांना चटणीसारखे एक तोंडी लावणे म्हणून डांगर करतांना प्रथम एक मोठ्ठा कांदा बारीक चिरून घ्यावा. कोथिंबीरही धुवून बारीक चिरून घ्यावी. एका बाउलमध्ये दोन - ३ मोठे चमचे वर तयार करून ठेवलेले डांगराचे पीठ घेऊन त्यात मावेल तेव्हढे आंबट ताक चिरलेला कांदा,कोथिंबीर घालून छान कालवून एकजीव झाल्यावर १५ मिनिटे थोडे मुरू द्यावे ,चव बघून हवे असल्यास मीठ,तिखट,साखर घालून वर कडकडीत तेलात हळद,हिंग,मोहोरी,जिरे घालून फोडणी करून ती घालून मिसळावे.

मुगाच्या गरगरम खिचडीसोबत तोंडीलावणे म्हणून हे चटकदार डांगर फार छान लागते.