Sunday 25 February 2018

दोडका-सिमला मिरची चटणी



साहित्य : एक दोडका,एक सिमला मिरची ,एक टोमॅटो,एक कांदा,दोन हिरव्या मिरच्या,दोन सुक्या लाल मिरच्या,चिंचेचे बुटुक,चमचाभर तेल. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,एक चमचा लिंबाचा रस,चवीनुसार मीठ.
कृती : दोडका व सिमला मिरचीच्या चकत्या चिरून घ्या. कांदा व टोमॅटो बारीक चिरून ठेवा.
गॅसवर एका पॅन मध्ये तेल गरम करून घेऊन त्यात प्रथण कांदा सोनेरी  रंगावर परतून घ्या व त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व मिरच्या (दोन्ही प्रकारच्या हिरव्या व सुक्या लाल) घालून परतून/शिजवून घ्या.
आता त्यात सिमला मिरचीच्या चकत्या घालून परता. ४-५ मिनिटे मिरच्या परतल्यावर शेवटी त्यात दोडक्याच्या चकत्या,बारीक चिरलेली कोथिंबीर  व चवीनुसार मीठ घालून शिजून मऊ होईपपर्यंत परता. आता त्यात चिंच घालाव एक मिनिट परतून गॅस बंद करा.
थंड झाल्यावर हे सगळे मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये घालून चटणी वाटून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या चटणीवर हिंग, मोहरी व कढी पत्त्याची तडका फोडणी घालू शकता.


Thursday 22 February 2018

झणझणीत फोडणीचा ठेचा

झणझणीत फोडणीचा ठेचा

हिरव्या मिरच्या भाजून घ्या व  मग भाजून झालयावर त्या मिक्सर मधून सोबत लसूण आणि कोथिंबीरघालून वाटून घ्या. ह्यात चवीनुसार मीठ घाला की  हा आपला नॉर्मल ठेचा तयार. हाच ठेचा खान्देशात भरीत करीत असताना वापरतात.  
आता बारीक चिरलेला कांदा छान पॅन मध्ये तेलात गुलाबी रंगाच्या होईपर्यँत परतायचा. मग त्यात एक चिरलेला टोमॅटो अगदी तो मऊ  होईपर्यंत परतवायचा. मग त्यात हा झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालायचा. थोडा वेळा छान कांदा, टोमॅटो मध्ये एकजीव होईपर्यंत परतवायचं आणि आवश्यक तेवढं चवीनुसारमीठ घालायचं. हा झाला तुमचा फोडणीचा ठेचा तयार. फोडणीचा ठेचा करताना मीठ सगळ्यात शेवटी घालायचं
हा ठेचा नुसता पोळी किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ताका पासून बनलेल्या कढी सोबत सुद्धा छान लागतो.
खानदेशात ठेचा हा ठेचून करतात त्यासाठी बडगी आणि लाकडाची ठेचणी वापरली जाते. 

चटकदार पुणेरी मिसळ

चटकदार पुणेरी मिसळ


साहित्य : तीन वाट्या मोड आलेली मटकी,एक मोठा बटाटा,एक टेबलस्पून आले- लसूण यांची पेस्ट,दोन वाट्या जाड पोहे (भिजवलेले) ,आवश्यकतेनुसार तेल,फोडणीसाठी एक चमचा  मोहरी ,एक चमचा जिरे,अर्धा चमचा हळद,एका लिंबाच्या फोडी,चार कांदे ,एक मोठा टोमॅटो ,दोन वाट्या  तयार फरसाण,एक वाटी बारीक शेव,पावाचे ७-8 स्लाइस,अर्धी वाटी  सुक्या खोबर्‍याचा कीस, चवीनुसार तिखट आणि  मीठ,एक चमचा गरम मसाला,एक वाटी बारीक चिलेली कोथिंबीर अर्धी, चवीपुरती साखर.
कृती : सुरवातीला पोहे बनवून घ्या. पोहे बनवण्यासाठी गॅसवर एका कढईत २ चमचे तेल घालून त्यात पाव चमचा मोहरी व जिरे तडतडू द्यावे. चिमूटभर हळद टाकावी व फोडणी थोडी परतून गेटल्यावर त्या फोडणीत पोहे व मीठ घालून ढवळून २ मिनिटाने गॅस बंद करावा व पोह्याची कढई खाली उतरवून घ्यावी.
आता मिसळीसाठी मटकीची उसळ बनवण्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये मोड आलेली मटकी व ५-६ ग्लास पाणी घेऊन त्यात १५-२० मिनिटे उकळत ठेवून मटकी शिजवून घ्यावी. थोडी मटकी हाताने दाबून पहावी. शिजली असल्यास मग त्याचे पाणी का पॅनमध्ये काढून बाजूला ठेवावे. आता गॅसवर एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घेऊन त्यात पाव चमचा मोहरी व पाव चमचा जिरे घालून छान तडतडू द्यावे. मग  त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा ब्राऊन रंगावर शिजल्यावर चिमूटभर हळद, एक चमचा आले-लसूण पेस्ट टाकून थोडेसे परतावे. आता टोमॅटोच्या फोडी आणि  तिखट टाकावे. दोन मिनिटे परतावे. मोड आलेली शिजलेली मटकी, मीठ टाकून त्यात उकडलेला बटाटा अर्धवट कुस्करून टाकावा. उसळ पूर्ण कोरडी होऊ द्यावी. 
कट (तिखट तर्री-रस्सा) बनवण्यासाठी प्रथम एक कांदा चिरून घ्यावा. गॅसवर एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून त्यावर खरपूस परतावा. त्याच पॅनमध्ये  सुक्या खोबर्‍याचा कीस भाजून घ्यावा. खोबरे व कांदा एकत्र करून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटून घ्यावे. आता एका भांड्यात ३-४ टेबलसून तेल घ्यावे. त्यात मिक्सरवर वाटलेले कांदा-खोबर्‍याचे वाटण  एक चमचा आले-लसूण पेस्ट, तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला टाकून मंद आंचेवर ५ मिनिटे परतत राहावे. मग त्यात मोडाची मटकी शिजवण्यासाथी वापरलेले व नंतर काढून बाजूला ठेवलेले पाणी टाकून कट पातळ करून घ्यावा. वाटल्यास अजून पाणी टाकून हावा तेव्हढा पातळ करावा.
सर्व्ह करताना एक मोठी सर्व्हिंग प्लेट घेऊन त्या मोठ्या प्लेटमध्ये ददुसर्‍या सर्व्हिंग उथळ बाऊलमध्ये प्रथम पोहे, त्यावर मटकीची सुकी उसळ, बारीक चिरलेला कांदा, तयार फरसाण, बारीक शेव व बारीक चिरलेली कोथिंबीर यांनी सजावट करावी आणि गरम तर्री-कट रस्सा अजून दोन स्वतंत्र बाऊल्स मध्ये बाजूला द्यावा. सोबत पावाचे स्लाइस (ब्रेड) व लिंबाची फोड घालून ही चटकदार पुणेरी मिसळ सर्व्ह करावी.



Tuesday 13 February 2018

वरीचे तांदूळ ,कच्चा बटाटा,रताळे,काकडी,साबुदाणा यांचे उपासाचे मिश्र थालीपीठ

वरीचे तांदूळ ,कच्चा बटाटा,रताळे,काकडी,साबुदाणा यांचे उपासाचे मिश्र थालीपीठ

(खास महाशिवरात्रीसाठी)






साहित्य : एक वाटी वरीचे तांदूळ (भगर),एक (मध्यम) बटाटा ,एक काकडी,मूठभर भिजवलेला साबुदाणा,एक चमचा जिरे,चवीनुसार मीठ व हिरवी मिरची,थालीपीठ लावण्यासाठी तेल किंवा तूप,आणि ज्यांना उपासाला चालते त्यांच्यासाठी एक टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : दोन तास आगोदर साबुदाणा भिजत घालून ठेवा. कच्चा बटाटा,रताळे व काकडी (साले काढून) स्वतंत्रपणे किसणीवर किसून ठेवा. वरीचे तांदूळ(भगर)तुपावर भाजून घेऊन त्यात चवीनुसार मीठ,हिरवी मिरची व जिरे घालून मिक्सरवर वाटून घेऊन एका तसराळयात (बाऊलमध्ये) काढून घ्या व त्यात कच्च्या बटाट्याचा कीस,काकडी व रताळे यांचा कीस ,भिजवलेला साबुदाणा आणि ज्यांना चालते त्यांनी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थालीपीठाचे घट्ट पीठ (आवश्यता वाटल्यास थोडेसे पाणी घाला) भिजवून १५-२० मिनिटे झाका व मुरत ठेवल्यावर तव्यावर तुपात किंवा तेलावर थालीपीठ ठापून त्यावर बोटाने गोलाकार चार व मध्यभागी एक भोक पाडून त्यात तूप किंवा  तेल सोडा आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
लिंबाचे लोणचे व ताजे गोडसर मलईच्या दहयासोबत गरम थालीपीठ सर्व्ह करा.