Monday 29 January 2018

बायो गॅस निर्मिती सयंत्र

बायो गॅस निर्मिती सयंत्र





ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी गेल्या दशकात जगभर जोरात चालू असलेल्या चळवळीत , पर्यावरणास पूरक असा आम्ही चालू केलेला आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या घरातील रोजचा निर्माण होणारा सर्व प्रकारचा ओला कचरा ( यात शिळे किंवा खराब झालेले  अन्न भाजीपल्याचा टाकाऊ भाग) महानगरपालिकेच्या कचराकुंडीत टाकता त्याचा पुर्नवापर करून  पर्यावरणास  हातभार लागावा म्हणून आम्ही  अतिशय हौसेने ०१ जुलै २००६ रोजी माझ्या जुन्या घराच्या १० x१५ गच्चीवर बायो-गॅसची निर्मिती संयंत्राची उभारणी केली असून त्यातून निर्माण होणार्‍या गॅसचा वापर सुरू केल्यापासून  पासून माझ्या L.P.G.(बरशेन) गॅस सिलिंडरच्या वापरात २५ दिवसापर्यंत बचत होऊ लागली आहे, त्याचप्रमाणे गॅस निर्मिती सुरू झाल्यावर त्यातून उत्सर्जीत होणारे अतिरिक्त सांडपाणीसुध्दा बायो-कल्चरसाठी खत म्हणूनच वापरले जाते. एकुण खर्च ७४५०/- या प्रकल्पासाठी माझ्या गच्चीवरील एका कोपर्‍यातील ५ x जागा लागली. (या प्रकल्पामुळे माझा एल.पी.जी.सिलिंडर २१ दिवस जास्त जाऊ लागला म्हणजेच दरमहा सुमारे २५० रुपयांची बचत होऊ लागली होती. त्यामुळे माझा या प्रकल्पावर झालेला खर्च २.५ वर्षात म्हणजे ३१ जानेवारी २००९ मध्येच भरून निघाला व त्यानंतर मी या बचतीचा लाभ घेत आहे. आता तर सरकारने गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद करायचे ठरवल्यामुळे खुल्या बाजारात गॅस सिलिंडरच्या किमती ८०० रुपयांपर्यंत  जाणार आहेत हे लक्षात घेतले तर दरमहाची बचत रुपये ६५० पर्यन्त होईल) याखेरीज नागरिकांना अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर  करवावयास प्रोत्साहित करण्याचे उद्देशाने पुणे म.न.पा.ने जे नागरिक आशा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करत असतील त्यांना त्यांच्या वार्षिक मिळकत करात ५ % सवलत देण्यास सुरुवात केली आहे . हा आणखी एक आर्थिक फायदा होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे  आपण पर्यावरणासंबंधात काहीतरी करतो याचे लाख मोलाचे मानसिक समाधान मिळते ते वेगळेच.
आमच्या या व मातीविरहित बगीचा या उपक्रमादद्वारे गेल ८-१० वर्षे आम्ही आमच्या घारातीलच नव्हे तर आजूबाजूस मिळणारा ओला कचरा जिरवत आहोत त्या कार्याचा गौरव म्हणून पुणे महानगर पालिकेने २ ऑक्टोबर २०१६ ला बालगंधर्व  येथे झालेल्या दिमाखदार समारंभात मानाचा " स्वच्छ " पुरस्कार व रोख रुपये २५,०००/- देऊन यथोचित सन्मानही केला आहे.
बायो-गॅस सयंत्रात फोटोत दिसते त्याप्रमाणे सिंटेक्स च्या दोन टाक्या असतात . बाहेरची टाकी आकाराने मोठी असते (माझी १००० लिटर्सची आहे) व दुसरी टाकी ही उलटी करून आंत सोडायची असल्याने बाहेरच्या टाकी पेक्षा  आकाराने थोडीशी छोटी टाकी असते  (माझी ७५० लिटर्सची आहे)  दोन्ही टाक्यांचा वरचा भाग कापून काढून त्याचे उघडे हौद करून घेतात. बाहेरच्या टाकीला तळापासून दोन इंच ऊंचीवर वर एक   ४ “ चे भोक पाडून त्यात चार इंचांचा एक पी.व्ही.सी.पाइप इनलेट (ओला कचरा टाकण्यासाठी) व वॉशआऊट ( टाकीत फारच घट्ट गाळ तयार झाला तर तो धुण्यासाठी) ह्यासाठी बसवलेला असतो व वरच्या टोकापासून ३ “ खाली एक  ३ “ आकाराचे भोक पाडून त्यात ३” चा पी.व्ही.सी.पाइप ओव्हरफ्लो साठी(टाकीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा व्हावा यासाठी)  बसवलेला असतो. उपड्या करून बसवायच्या आतील टाकीत गॅस साठवला जातो व तो बाहेर शेगडीकडे घेऊन जाण्यासाठी एक १/२ “ चे भोक पाडून त्यात एक १/२ “ जीआय.आय.चा एलबो बसवून त्याचेपुढे एक नोझल व्हॉल्व बसवतात व त्याच्या नोझलला पुढे एक रबरी नळी ( बागेत झाडांना पाणी देण्यासाठी वापरतो ती)बसवून त्यातून गॅस शेगडीस पुरवला जातो. या गॅस साठी आपली एल.पी.जी.ची नेहमीची शेगडी चालत नाही तर मोठ्या जाळीचा बर्नर असलेली गोबर गॅसला असते ती शेगडीच  लागते.
आता हे सयंत्र तयार करतांना प्रथम वर सांगितल्याप्रमाणे बाहेरची टाकी भोके पाडून घेऊन त्यात इनलेट,वॉशआऊट, ओव्हरफ्लो साठीचे ४” / ३” चे पी.व्ही.सी.पाइप्स बसवून घेऊन तयार करून घेऊन त्यात ओव्हरफ्लो पर्यन्त पाणी भरावे.दुसर्‍या एका रिकाम्या टाकीत ४० किलो गायी-म्हशीच्या शेणाचा पाण्यात काला करून  घेऊन तो टाकला जातो,मग मोठ्या टाकीत छोटी टाकी उपडी करून बसवतात. साधारणपणे एक आठवड्याने  शेणामुळे बक्टेरिया निर्माण झाले की इनलेट पाइप मधून घरातील शिळे अन्न व इतर ओला कचरा टाकायला सुरुवात करावी. भाजीची देठे कापून त्याचे बारीक तुकडे करून घालावेत. फणस , कालिंगडासारख्या फळांच्या सालीही  बारीक तुकडे करूनच घालावीत. या टाकीत चहाचा चोथा, मटाराची साले (कापून बारीक तुकडे करून) ,वालाची (बिरड्या / डाळिंबी)  साले, केळी,आंबे यांच्या साली,बुरशी आलेले पाव,आंबलेला भात, अगदी मेलेली झुरळे,उंदीर,घुशी घातले तरी त्यापासूनही विघटन होऊन त्यापासून मिथेनगॅस मिळतो. ज्या कचर्‍याचे विघटन होऊ शकेल असा कुठलाही ओला कचरा यात टाकलेला चालतो. ( आपण जेवतांना जसे चाउन खातो तसे बक्टेरियाला विघटन करायला जास्त वेळ लागू नये म्हणून जितके बारीक करून घालू तेव्हढे उत्तम) जर पिठाच्या गिरणीत जमिनीवर सांडणारे खराब कोरडे पीठ , किंवा घरात पोरकिडे झालेले / जाळ्या झालेले खराब पीठ ,  मिळाले तर जास्त गॅसची निर्मिती होते. गॅस तयार झाला की उपडी बसवलेली टाकी गॅसचे दाबाने वर  वर जाऊ लागते व त्याला बसवलेला व्हॉल्व चालु केल्यावर रबरी नळीवाटे  निर्माण झालेला मिथेन गॅस शेगडीस पुरवला जात असल्याने तो पेटतो.

या टाकीचे अगदी जवळ जाऊन उभे राहून नाकाने हुंगले  तरी कचर्‍याची दुर्गंधी येत नाही,डांस,माशा,चिलटे यांचा कसलाही त्रास होत नाही. गॅस पेटला असतांना त्याला कसलाही वास येत नाही. ज्योत एकदम निळी असते त्यामुळे भांडी काळी होत नाहीत. गॅस वार्‍याने विझला तर मात्र थोडासा उग्र वास येतो व त्यामुळे गॅस विझल्याचे लगेच
ध्यानात येते. हा गॅस साठवून ठेवता येत नाही,त्यामुळे दररोज निर्माण होणारा गॅस रोजच्या रोज वापरुन संपवावाच लागतो.
या पद्धतीत देखभाल फारशी नसते. फक्त १-१.५ वर्षाने गॅस वाहून नेणारी रबरी नळी हवेने/ उन्हाने कडक होऊन त्यास चिरा पडल्याने बदलावी लागते. बाहेरच्या टाकीतील पाण्याची पातळी कमी झाल्यास पाणीi भरावे लागते. ओव्हरफ्लो झालेले पाणी तुम्ही बागेतील फुलझाडांच्या कुंड्यांना घालू शकता , कारण त्यात खताचे गुण असतात. माझी टाकी सहा वर्षांनंतर आत खूपच घट्ट गाळ तयार झाल्याने मोकळी करून / धुवून घ्यावी लागली व दोन वेळा रबरी नळी बदलावी लागली.
आधुन मधून कार्बन गॅसचा त्रास उद्भवला त्यावेळी टाकीत तयार झालेला संपूर्ण गॅस नळीवाटे बाहेर जाऊ दिला व नंतर नव्याने मिथेन  वायु तयार झाल्यावर पुन्हा शेगडी पेटू लागली.
मात्र या बायो गॅस प्रकल्पाच्याही  खालील प्रमाणे काही मर्यादा आहेत :
या बायो-गॅस निर्मिती सयंत्रात आपण घरातील कोणत्याही प्रकारचा ओला कचरा टाकतो व बक्टेरिया तो खातात आणि  खातांना त्याचे विघटन करून त्यातील मिथेन गॅस बाजूला करतात. हा मिथेन वजनाने हलका असल्याने वर जातो व तोच गॅस (वायु) नळीवाटे आपल्या स्वयंपाकघरातील शेगडीला जोडला जातो. पण हा मिथेन वायु साठवण टाकीतून ग्रॅव्हिटीने (वरुन  खाली)येत असल्याने आपली गॅस साठवण टाकी शेगडीच्या वर असावी लागते ,म्हणजेच ती टाकी आपण रहात असलेल्या घराच्या गच्चीवरच बसवावी लागते,तळमजल्यावर बसवून चालत नाही.
दुसरे असे की हा मिथेन वायु ग्रॅव्हिटीने येत असल्याने त्यास “ प्रेशर”  नसते.त्यामुळेच याची आंच (उष्णता) कमी असते. त्यामुळे चहासाठी पाणी उकळायला फार वेळ लागतो,भाजी शिजायलासुद्धा वेळ लागतो.तसेच पोळ्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. मात्र ज्यासाठी मंद आंच लागते अश्या कामांसाठी उदा. शेंगदाणे किंवा रवा भाजणे किंवा लोणी काढवण्यासाठी हा गॅस एकदम उत्तम !
कधी कधी यात मिथेन बरोबर कार्बन वायु तयार होतो व त्यामुळे तो पेटत नाही. अशावेळी साठवण टाकीतील सर्व गॅस काढून टाकायला लागतो.
ही गॅस बनण्याची प्रक्रिया जलद होण्यासाठी हवेतील टेंपरेचर ३० अंश सेल्सियासपेक्षा जास्त असावे लागते. म्हणून पावसाळ्यात व थंडीत गॅस बनण्याची क्रिया सावकाश व मंद असते.
या सयंत्रामुळे आम्हाला  आजपर्‍यात झालेले प्रत्यक्ष लाभ खालीलप्रमाणे आहेत.
१. आपल्या घरात दररोज निर्माण होणारा  संपूर्ण ओला कचरा (किचन वेस्ट) या सयंत्रा मध्ये पूर्णत: विघटन होऊन जिरतो. त्यमुळे आपल्या घरातील एक कणभरही ओला व विघटनशील  कचरा आपल्या घरातून बाहेर जाणार नाही. किंवा त्याच्यात दुसऱ्या माणसाला हात घालावा लागणार नाही. समाजावर व सरकारी यंत्रणेवर येणारे आपल्या घरच्या ओल्या कचऱ्याचे ओझे निघून जाईल. आपल्या गाव शहरा बाहेर साठलेले कचऱ्याचे ढीग व त्यामुळे तेथील नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी हा उपक्रम राबवून आपल्याला आपला खारीचा वाटा उचलण्याचे जे मानसिक बहुमोल समाधान आपल्याला मिळेल त्याची तुलना पैशात मोजता येणे अशक्यच !

२. दरवर्षी ७ ते ८ LPG सिलेंडर ची बचत होते म्हणजेच दरमहा रु. ४५० ते ५०० पर्यन्तआर्थिक बचत होते.
१०किलो पर्यन्त ओला कचरा जिरवू  शकणारा १००० लिटर क्षमतेचे सयंत्र  वर्षाकाठी ७ ते ८ सिलिंडर इतके इंधन निर्माण करते. ही हरित उर्जा निर्माण करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. जीवाश्म इंधने म्हणजे (fossil fuel) यांच्या वरील अवलंबन कमी करण्यासाठीचे हे एक उत्तम कमी खर्चाचे व फायदेशीर असे ठोस पाऊल आहे!

३. या सयंत्रातून बाहेर पडणारी स्लरी: ही उत्तम प्रकाचे सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो. या सयंत्रामधून जी स्लरी बाहेर पडते ती बागेसाठी, शेतीसाठी सेंद्रिय खात म्हणून वापरता येते त्यामुळे खतांवरील अवलंबन व खर्च कमी होतो.
१००० लिटर वायु: घरगुती बायोगॅस सयंत्राची आकडेवारी 
घरातील ओला कचरा जिरवण्याची  क्षमता ८ ते१०  किलो/दररोज
स्वयंपाकासाठी गॅस  दोन ते अडीच तास / दररोज  
बाहेर पडणारी स्लरी २० ते २५ लिटर/ दर आठवड्यास
या सयंत्रासाठी तांत्रिक सल्लागार : Appropriate Rural Techno. Institute. ( आरती) 020 - 2439 22884
या प्रकल्पाविषयी काही शंका/प्रश्न  असल्यास मला पुढील पत्यावर येऊन प्रत्यक्ष भेटावे किंवा संपर्क साधावा.
प्रमोद तांबे ,१४१५,सदाशिव पेठ,रेणुका स्वरूप मुलींच्या शाळेजवळ पुणे ४११०३० दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३ Email I.D. : pltambe@yahoo.co.in



Thursday 25 January 2018

गाजराची कोशिंबीर

गाजराची कोशिंबीर


साहित्य : चार मध्यम आकाराची लालबुंद गाजरे, अर्धे लिंबू, चार चमचे शेंगदाण्याचे भरड कूट , चवीपुरते मीठ,साखर,लाल तिखट ,फोडणीसाठी दोन चमचे तेल ,मोहरी, जिरे,हिंग व हळद,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : प्रथम गाजरं स्वच्छ धुवून व कोरडी करून घेऊन किसणीवर किसून घ्या. एका मोठ्या बाउल्म्ध्ये गाजराचा कीस घेऊन त्यात अर्धे लिंबू पिळा,शेंगदाण्याचे भरड कूट घाला,चवीपुते मीठ व साखर घाला. आता गॅसवर एका कढलीत फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी,जिरे घालून ते चांगले तडतडल्यावरच हिंग ,हळद घाला व गॅस बंद करून मग लाल तिखट घालून ती फोडणी कोशिंबीरीवर घाला, वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चमच्याने कोशिंबीर हलवून मिक्स करून घ्या.

काकडी भात

काकडी भात


साहित्य : एक वाटी तांदळाचा शिजवलेला भात,दोन मोठया खिरा काकड्या किसून किंवा चोचचून ,दोन वाट्या घट्ट मलईचे (सायीचं) दही , एक कप किंवा गरजेनुसार दुध ,चवीनुसार मीठ आणि साखर,एक चमचा आल्याचा कीस , दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,८-१० कढीपत्त्याची पाने,मूठभर कोथिंबीर,डावभर तेल,फोडणीच साहित्य मोहरी,जिरे,हळद व हिंग.
कृती : एका परातीत शिजवलेला भात मोकळा करून घेऊन त्या भातात दही , दुध , साखर , मीठ आणि आल्याचा कीस घालून कालवावं .
गॅसवर एका काढल्यात तेल गरम करून घ्या व त्या गरम तेलात जिरं , मोहरी , हिंग ,हळद व कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून ती फोडणी भातात घालावी .
ऐन वेळी काकडी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भात सर्व्ह करा.

Friday 19 January 2018

बाजरी चे ढेबरे

बाजरी चे ढेबरे


साहित्य : एक वाटी बाजरी चे पीठ ,दोन चमचे दही,चविनुसार मीठ , लाल तिखट, हळद , हिंग,चिमूट भर ओवा,चविसाठी चिमूट भर साखर ,मूठभर तीळ,तळणीसाठी आवशकतेनुसार तेल. 
कृती : प्रथम एका परातीत बाजरीचे पीठ घ्यावे त्यात दोन चमचे दही,चविनुसार मीठ , लाल तिखट, हळद , हिंग,चिमूट भर ओवा,चविसाठी चिमूट भर साखर घालावी,थोडी मेथी बारीक चिरून धालावी,थोड आलं पण किसून घालावं आणि सर्व मिश्रण चांगले मळून घ्यावे व लिंबा एवढे गोळे करा. 
आता केळीच्या पानावर हाताला थोडे पाणी लावून ढेबरे थापून वरच्या बाजूला तीळ पसरावे व हे बाजरीचे ढेबरे त्यापलेल्या तेलात तळून काढा . छान फुगतात . हे प्रवासात पण नेतां येतात कारण तेखूप दिवस टिकतात .

कोहळ्याचे घारगे




कोहळा किसुन व कीस थोडा वाफवून घेऊन त्यात गुळ, दोन चमचे तांदुळाची रवाळ पीठी आणि चिमुट्भर मीठ घालुन त्यात मावेल एवढी कणिक घालायची आणि पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तेवढी सैल भिजवायची. ह्याच्या तळहाता एवढ्या जाडसर पोळ्या/पुर्याम लाटुन तव्यावर किंचित तुप सोडुन खरपुस भाजुन घ्यायच्या. ह्या पदार्थाचे नाव आठवत नाही पण बहुतेक ह्याला कोहळ्याचे घारगे म्हणतात.

आवळ्याची सुपारी




साहित्य :  १०-१५ मोठाले डोंगरी आवळे,पाव वाटी आल्याचा कीस,एक वाटी घट्ट मलईचे दही ,४ चमचे जिरेपूड,एक चमचा हिंग पूड,अर्धी वाटी सैंधव मीठ,एक टेबलस्पून पादेलोण.
 कृती : प्रथम डोंगरी आवळे किसून ठेवा.नंतर एका तसराळयात घट्ट मलईचे दही घेऊन त्यात आल्याचा कीस, जिरेपूड, हिंग सैंधव मीठ,पादेलोण हे चांगले मिक्स करून घेऊन आवळ्याच्या किसाला हाताने चोळून चोळून लावून घ्यावे आणि कडक उन्हात एका प्लास्टीकच्या मोठ्या कागदावर पसरून वाळत ठेवा. दोन-तीन दिवस कडक उन्हात चांगले  वाळवून घेऊन घट्ट झाकणाच्या बरणीत हे कोरडी झालेली आ
वळा सुपारी भरून ठेवा. 

Thursday 18 January 2018

तांबड्या माठाची भाजी (पालेभाजी)

तांबड्या माठाची भाजी (पालेभाजी)


साहित्य : दोन जुडड्या तांबड्या माठाची पालेभाजी (ही भाजी चोरटी होते म्हणजेच फारच कमी होते म्हणून दोन तरी जुडड्या घ्याव्यात),दोन मध्यम आकाराचे कांदे,चविपुरती साखर किंवा गूळ , मीठ व लाल तिखट,फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद व हिंग
कृती : प्रथम तांबडा माठ निवडून , स्वच्छ धुवून व बारीक चिरून घ्या ,कांदाही सोलून व बारीक चिरून घ्या मग गॅसवर काढीत तेल तापवून घेऊन चांगले तापल्यावर मोहरी टाका व ती तडततडल्यावर हिंग व हडळ घालून परतून घ्या नंतर माठाची भाजी घालून परतून घ्या व पाणी , चवीपुरते मीठ,लाल तिखट व साखर किंवा गूळ घालून ताटाने झाकून शिजवून घ्या वरच्या झाकणाच्या ताटात ठुदेसे पाणी घाला म्हणजे खालून व वरुन दोन्ही बाजूंनी  भाजी चांगली शिजेल. भाजी  शिजल्यावर झाकणातील पाणीही भाजीतच घाला व एक उकळी आल्यावर गॅस बंद करून टाका.
ही लाल भडक रसभरी भाजी पोळी किंवा  ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला फारच चविष्ट लागते