Thursday 29 June 2017

उपासाचे मिश्र लाडू

उपासाचे मिश्र लाडू 


साहित्य  : राजगिरा, साबूदाणा आणि शिंगाड्याचे पीठ प्रत्येकी एक वाटी  , दीड वाटी साजूक  तूप, दोन वाट्या पिठीसाखर , एक चमचा वेलचीपूड खाण्याचा रंग. 
कृती  :  प्रथम  गॅसवर एका कढईत तिन्ही पिठे कोरडी खमंग भाजून घ्यावीत , एका परातीत गरम केलेले पातळ साजूक तूप व पिठी साखर एकत्र करून  फेटून हयावी , त्यात चिमूटभर खाण्याचा रंग व वेलचीपूड घालावी , मग त्यात तिन्ही पिठे मिसळून लाडू वळावेत. जरूर वाटल्यास आणखी थोडे तूप घालावे.

काकडी पियुष (नमकीन)

काकडी पियुष (नमकीन)


साहित्य  : एक मोठी काकडी , अर्धा इंच आले, बारीक चिरलेली कोथिंबीर , एक चमचा लिंबाचा रस, दोन कप गोड ताक, मीठ, मिरेपूड, चाट मसाला, थोडा बर्फ. 
कृती :  काकडीची साले काढून त्याचे तुकडे करा.  मिक्‍सरमध्ये काकडीचे तुकडे, आले, लिंबाचा रस, साखर, मीठ घालून बारीक करा. 
नंतर त्यात थंडगार ताक, बर्फ, चाट मसाला व बारीक चिरलेलि कोथिंबीर  घाला व थंड करून सर्व्ह करा.

घावन घाटले

घावन घाटले





गौरीच्या नैवेद्याला घावन घाटले करण्याची पद्धत आहे.
घावन :तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे.आपल्या अंदाजाने पीठ घ्यावे. त्यात थोडे मीठ व पाणी घालून धिरड्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. सपाट तव्याला तेलाचाहात फिरवून त्यावर वरील पिठाची धिरडी घालावी. ह्याला घावन असे म्हणतात. हे घावन घाटल्याबरोबर खाण्याची पद्धत आहे.
घाटले :घाटले म्हणजे तांदळाचे पीठ गूळ-खोबरे वगैरे घालून केलेली एक प्रकारची खीरच आहे.
साहित्य व कृती : अर्धी वाटी तांदळाचे पीठ घ्यावे. एक वाटी बारीक चिरलेला गूळ, दीड वाटी नारळाचा चव, चिमूटभर जायफळाची पावडर एक  वाटी पाण्यात  पीठ मिसळून ठेवावे. एक  वाटी पाण्यात नारळाचा चव व गूळ एकजीव होईपर्यंत मिसळावा. नंतर त्यात ५ ते ६ वाटय़ा पाणी घालून पातेले मंद गॅसवर ठेवावे. उकळी आली की वाटीभर पाण्यात मिसळून ठेवलेले पीठ ओतावे. ते मिश्रण व्यवस्थित ढवळावे. उकळ्या येई तो घाटले ढवळत रहावे. त्यात वेलची / जायफळ पूड मिसळावी. घाटले थंड झाल्यावर फार दाट वाटल्यास थोडे उकळते पाणी मिसळून थोडा वेळ उकळावे. गरम गरम वाढावे. हे घाटले तांदळाच्या घावनाबरोबर खायला द्यावे.

Wednesday 28 June 2017

काकडीची खारी लस्सी

काकडीची खारी लस्सी


साहित्य : दोन काकड्या,अर्धा किलो मलईचे घट्ट मटका दही,अर्धा चमचा सैंधव मीठ,अर्धा चमचा जिरे पूड,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर ,बर्फाचे २-३ खडे
कृती :  काकड्यांची साले काढून घेऊन दोन्ही बाजूचा शेवटचा भाग कापून काढावा. काकडीचे बारीक तुकडे करून घ्यावेत किंवा किसून घ्यावी. मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे किंवा कीस,सैंधव मीठ,मलईचे घट्ट मटका दही ,जिरे पूड व थोडी बारीक चिरलेली कोथिंबर घालून फिरवून घ्यावे. लस्सी फार दाट वाटल्यासच थोडेसे पाणी घालावे.

लस्सी सर्व्ह करतेवेळी बर्फाचे तुकडे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावी. 

कारल्याची मसाला रस भाजी

कारल्याची मसाला रस भाजी


साहित्य  : ४-५ माध्यमाकाराची ताजी कोवळी कारली , एक वाटीभर चिंचेचा कोळ , चवीनुसार मीठ ,लाल मिरचीचे तिखट , एक कांदा , एक टोमाटो , आल्याचा पेरभर तुकडा , ८-१० लासणाच्या पाकळ्या , एक वाटी भरून ओल्या नारळाचा खोवलेला चव , एक वाटी भरून चिरलेली कोथिंबीर , फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल व मोहरी,जिरे,हिंग व हळद
कृती  : प्रथमकारली धुवून साफ व कोरडी करून घ्या व  कारल्याचे तुकडे करून घ्या . नंतर मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमाटो ,आले ,लसूण ,ओल्या  नारळाचा चव , कोथिंबीर यांचा वाटण करून घ्या
गॅसवर कढइत दोन चमचे तेल टाकून फोडणी करून घेऊन दोन मिनिटे ती परतून घ्या व मग त्या फोडणीत मसाला वाटण घाला व ते सुद्धा चांगले परतून घ्या , त्यात चवीनुसार मीठ, तिखट  आणि कारल्याच्या फोडी  टाकून पुन्हा एकदा परतून घ्या. आता चिंचेचा कोळ घाला आणि रसासाठी एक ग्लास पाणी टाकून कढईवर झाकण ठेऊन १५-२० मिनिटे शिजवा, भाजीला जरूर असेल तसा रस ठेवा !
भाजीवर वरून ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर टाकून डिश गारनिश करून सजवा
ही कारले रस  मसाला भाजी अजिबात कडू लागणार नाही

झटपट मसाला इडली – चटणी

झटपट मसाला इडली – चटणी


साहित्य : एक वाटी बारीक रवा , अर्धी वाटी आंबट दही,दोन वाट्या पाणी,एक चमचा इनोज फ्रूट सॉल्ट,
चवीनुसार मीठ,फोडणी साठी, एक टेबलस्पून  तेल, जिरे,मोहरी,हिंग,एक चमचा  उडीद डाळ चवीनुसार हिरवी  मिरची व ८-१० कढीपत्त्याची पाने, चिरलेली ताजी कोथिंबीर
कृती  : प्रथम एका बाउल मध्ये रवा घेऊन त्यामध्ये आंबट दही,मीठ आणि पाणी घालून गुठळया न होऊ देता हाताने हलवून सारखे करून घ्या व दहा मिनिटे झाकून ठेवा.
नंतर गॅसवर एका कढल्यामध्ये तेल तापवून घेऊन त्यात हिंग,जिरे,मोहरी,घालून फोडणी करावी .फोडणी मध्ये उडदाची डाळ मिरची व कढीपत्ता टाकून परतवावे.
आता ही तयार फोडणी भिजलेल्या रव्यावर ओतावी, आताच बारीक चिरलेली कोथिंबीरपण घालावी  व सगळे  मिश्रण नीट हलवावे. सगळ्यात शेवटी इनोज फ्रूट सॉल्टचे पावडर घालून वर थोडे पाणी शिंपडावे , (म्हणजे इनोज अ‍ॅक्टिव्ह होते)  आणि बाउलमधील मिश्रण सतत एकाच दिशेने गोलाकार हलवत राहावे.
आता इडली पात्राला थोड्याशा तेलाचा हात लावून हे तयार मिश्रण घालावे व ७ -८ मिनिट शिट्टी न लावता कुकरमध्ये  वाफवून घ्यावे .

तयार गरमा -गरम इडली नारळ-कोथिंबीरीच्या हिरव्या चटणीसोबत  खायला द्यावी . जरी चटणी नसेल तरी या मसाला इडल्या नुसत्या सुद्धा छान लागतात .