Friday, 5 May 2017

कारल्याची चिंच-गुळाची भाजीकारल्याची चिंच-गुळाची भाजी
                                                                                                                     
साहित्य: ४-५ कारली , दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे भरड कूट, दोन टेबलस्पून तिळाचं कूट, एक चमचा धणे पूड, एक चमचा जिरे पूड, दोन चमचे काळा गोडा मसाला, एक चमचा लाल मिरचीचे तिखट, दोन चमचे चिंचेचा कोळ, चवीनुसार गूळ, एक छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ ,  फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल, मोहरी, चिमूटभर हिंग

कृती : आगोदर कारल्याचे साधारणपणे एक इंच आकाराचे तुकडे करून घ्या.
गॅसवर एका पातेल्यात ३-४ कप पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात चिरलेली कारली घाला.कारली अर्धवट शिजेपर्यंत उकळू द्या. अर्धवट शिजल्यावर आणि कारल्यांचा रंग बदलल्यावर कारली पाण्यातून उपसून चाळणीत ठेवून पूर्ण पाणी निथळू द्या.
एका बाउलमध्ये शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट, धणे-जिरे पूड, काळा मसाला, लाल तिखट, चिंच-गूळ, हळद आणि मीठ असं सगळं एकत्र करा. नीट मिसळून एकजीव मसाला करा.
पाणी निथळलेल्या कारल्यांना हा मसाला चोळून लावा.
गॅसवर  एका नॉनस्टिक फ्राय पॅनमधे किंवा कढईत फोडणीसाठी तेल गरम करा. त्यात मोहरी-हिंग घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात मसाला चोळलेली कारली व चोळून शिल्लक राहिलेला मसाला घाला व  नीट हलवून झाकण ठेवा. अर्धा कप गरम पाणी घाला.
मंद आचेवर मधूनमधून हलवत कारली नीट शिजू द्या.
कारल्याची भाजी तयार आहे.
मसाल्याचं प्रमाण आपल्याला हवं तसं कमी जास्त करू शकता. ही भाजी जराशी तिखट आणि आंबट-गोड चांगली लागते.