Thursday 29 December 2016

शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया)



शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया)

हा कोकणातील एक खास पारंपारिक असा गोडाचा पदार्थ आहे. मध्यंतरी आम्ही नरेंद्र बरोबर मढाळच्या शेतावर गेलो होतो तेंव्हा गुढ्याच्या वसंत तांबे यांच्याकडे प्रथमच हा पदार्थ खाला व त्याचवेळी रेसीपी  समजून घेतली.
साहित्य : दोन  मोठ्या वाट्या उकडीच्या मोदकासाठी  वापरतो ती तांदूळाची पिठी,एका मोठ्या नारळाचा खोवून काढलेला चव,दोन वाट्या गूळ,एक छोटा चमचा वेलची पूड. सजावटीसाठी ड्राय फ्रूटसचे  काप.
कृती :  सुरवातीला तांदूळाची पिठी दोन वाट्या गरम पाण्यात छोटा चमचा मीठ घालून मोदकासाठी आपण नेहमी  काढतो त्याप्रमाणे उकड काढून घ्यावी. . थोडयावेळाने उकडीचे पीठ चांगले मळून घेऊन त्या पिठाचे ७-८ गोळे करुन घ्यावे . मोठया भांड्यात गोळे बुडतील इतपत पाणी उकळत ठेवावे . पाण्याला उकळी आल्यावर त्यात हे उकडीच्या पिठाचे गोळे सोडावे. नंतर ७-८ मिनीटे मोठया गॅसवर शिजवावे. शिजून गोळे पाण्यावर तरंगू लागल्यावर लगेच बाहेर काढून चकलीच्या साच्यात घालून शेवया काढाव्या.
ओल्या नारळाचा चव, कोमट पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावा. घट्ट पिळून त्याचे दूध काढून गाळून घ्यावे. फार पातळ करू नये. जरा दाटसरच असावे. या दुधात बारीक चिरलेला गूळ कुसकरून घालावा. दूध चांगले गोड व्हायला हवे. वेलची पावडर घालावी, मग त्या शेवया घालून वरून ड्राय फ्रूटसचे काप घालून सर्व्ह कराव्या

No comments:

Post a Comment