Monday 12 September 2016

कडधान्यांचा पुलाव



कडधान्यांचा पुलाव 

साहित्य : तीन वाट्या दिल्ली राईस, काबुली चणे (छोले) , हिरवे हरबरे, हिरवे वाटाणे, डबल-बी, राजमा, मटकी व हिरवे मूग ही सगळी कडधान्ये समप्रमाणात घ्यावीत , दोन मोठे कांदे, दोन टोमॅटो, ल्याचा तुकडा, ८-१० लसणाच्या पाकळय़ा, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, ७-८ पुदिन्याची पाने, एक वाटी दही, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, दोन तमालपत्र, चवीनुसार मीठ, चिमूटभर जिलेबी रंग, १५-२० काजूपाकळ्या, १०-१५ मनुका,चार टेबलस्पून साजूक तूप, दोन टेबलस्पून तेल, एक छोटा चमचा हळद,एका लिंबाच्या फोडी .
कृती : हिरवे मूग व मटकी सोडून उरलेली सर्व कडधान्ये थोडे मीठ घालून उकडून घ्यावीत. (जास्त शिजवून मेण/गाळ होऊ देऊ नये.) कांदा आणि टोमॅटो लांबलांब पातळ चिरून ठेवावे. आले, लसूण, कोथिंबीर, पुदिना यांची मिक्सरवर वाटून पेस्ट करून घ्यावी. उकडलेली सर्व कडधान्ये एका मोठ्या तसराळयात काढून घ्यावी. त्यातील पाणी काढून टाकावे. नंतर त्या कडधान्यांवर वाटून ठेवलेला मसाला, दही, हळद सर्वघालावे व चांगले कालवावे. अर्धा तास तसेच मुरत ठेवावे. तोपर्यंत एका कढईल थोडय़ा तेलावर हिंग, हळद घालून मटकी व मूग परतून घ्यावेत.
गॅसवर एका पातेल्यात एक चमचा तेल गरम करून घेऊन त्यावर तमालपत्र घालून कांदा घालावा. कांदा परतवून होत आला की, त्यावर टोमॅटोच्या बारीक फोडी घालाव्यात. हळद घालून नंतर लाल मिरची पावडर व गरम मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालून लगेच तसराळयात मसाला लावून मुरत ठेवलेली कडधान्ये घालावीत. सर्व चांगले हलवून ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
दिल्ली राईसाला तूप व गरम मसाल्याची फोडणी देऊन तांदूळ चांगले उकळून (शिजवून) घ्यावे. त्यात शिजवतानाच भरपूर पाणी घालावे. भात शिजला की उरलेले पाणी चाळणीने गाळून घ्यावे. तो शिजवलेला थोडा भात पातेल्यात भाज्यांवर घालावा. नंतर त्यावर फ्राय केलेले मूग व मटकी घालावे. काजू व मनुके घालावे व उरलेला भात त्यावर घालून चमच्याने एकसारखा करावा. चमच्याने त्या भातावर ४-५ छेद करावेत. त्यात थोडय़ा पाण्यात कालवून जिलेबीचा रंग घालावा. नंतर त्यावर चमचाभर साजूक तूप सोडावे व झाकण घालून ठेवावे. तव्यावर ते पुलावाचे भांडे ठेवावे. मंद आचेवर १० ते १५ मिनिटे पुलाव शिजू द्यावा.
पुलाव सर्व्ह करतांना एका बाजूने काढावा व सर्व मसाला वगैरे चांगले मिक्स करून वाढावे. त्यासोबत लिंबू व कोशिंबीर द्यावी. सर्व कडधान्यामुळे हा पुलाव चवदार लागतो.
टीप- सर्व कडधान्ये आपल्या अंदाजाने थोडी-थोडी घ्यावीत. कारण कडधान्ये पाण्यात भिजत घातल्यावर फुगतात. त्यामुळे प्रमाणशीर घ्यावीत. शक्यतो दिल्ली राइस वापरावा. म्हणजे भात छान मोकळा होतो.

No comments:

Post a Comment