Thursday, 11 September 2014

गणेश विसर्जन - काही विचार

गणेश विसर्जन - काही मूलभूत विचार  गणेश विसर्जन म्हटलं की सर्व अभक्त एकमुखाने कंठशोष करत असतात...गणपति बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या ! 
पण विसर्जन केले आणी संपला! इतका आमचा बाप्पा हलका नाही! 
या पार्थिमूर्तीपूजन व विसर्जनाबाबत समर्थ रामदासांनी दासबोधात काय लिहून ठेवले आहे ते विचार करण्यासारखे आहे.
समर्थ म्हणातात, की मातीच्या (शाडूच्या)  मूर्तीची आधी दहा दिवस पूजा करायची व  मग सर्वच विसर्जन करावयाचे  हे अंतःकरणाला पटत नाही.
मृतिकापूजन करावें | आणी सवेंचि
विसर्जावें | हें मानेना स्वभावें | अंतःकर्णासी ||||
देव पूजावा आणी टाकावा | हें प्रशस्त न वटे
जीवा | याचा विचार पाहावा | अंतर्यामीं ||||
देव करिजे ऐसा नाहीं | देव टाकिजे ऐसा नाहीं |
म्हणोनि याचा कांहीं | विचार पाहावा ||||
देव नाना शरीरें धरितो | धरुनी मागुती सोडितो |
तरी तो देव कैसा आहे तो | विवेकें वोळखावा ||||
नाना साधनें निरूपणें | देव शोधायाकारणें |
सकळ आपुले अंतःकर्णें | समजलें पाहिजे ||||
इथे विवेकानेच काम करायचे आहे. भोळा भाव इथे काहीच कामाचा नाही. कारण भोळ्या भावाठायी आज्ञानच उपजण्याची शक्यता जास्त शक्यता ! आणि अज्ञानाने देव कधीच भेटत नाही.  
आपल्याला हे कळायला हवे की अरे मूढा हा देव आपण घडवू शकू असाही नाही आणि नष्ट करू शकू असेही त्याचे अस्तित्त्व नाही. तो आहेच ! अगदी सर्वत्र आहे. स्व-इच्छेने तो अनेक शरीरे धारणही करू शकतो व त्या देहांचा त्याघी करू शकतो त्यामुळे हा देव नक्की आहे तरी कसा ? हे कळावे म्हणून हा उपद्व्याप आहे. आधी त्याला आवाहन करताच तो मूर्तीत वास करून त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो आणि विसर्जन होऊनही सर्वत्र शिल्लक रहातो , अनुभव देतो तोच खरादेव आहे  व आम्हाला  तोच विवेकाने जाणून घ्यायचा आहे.
म्हणोनि जितुका भोळा भाव | तितुका अज्ञानाचा
स्वभाव | अज्ञानें तरी देवाधिदेव | पाविजेल कैचा ||११||