Monday 31 March 2014

फ्लॉवरच्या करंज्या

फ्लॉवरच्या करंज्या

फ्लावरच्या करंज्या : अर्धा किलो किसलेला फ्लावर ,अर्धा चमचा हळद ,एक चमचा लाल तिखट , चवीनुसार दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे  तुकडे ,थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबिर ,अर्धा चमचा मीठ ,अर्धा चमचा साखर , घट्ट मळलेली कणिक . तळणीसाठी तेल .
किसलेल्या फ्लॉवरमध्ये वरील सर्व साहित्य घालून वाफवून घ्या,वाफालेली भाजी करून थंड होऊ द्यावी.
कणकेचा पुर्‍या लाटून घेऊन त्यात हे सारण नेहमी सारखे करंज्या करतो तसे भरून करंज्या करुन घेऊन त्या तापलेल्या तेलात टाळून घ्या व गरमागरन असतांनाच सर्व्ह करा.

Sunday 30 March 2014

शिळ्या पोळीचे स्वादिष्ट खमंग लाडू

शिळ्या पोळीचे स्वादिष्ट खमंग लाडू
नमस्कार मित्रहो ! आज आहे रविवार , दिनांक ३० मार्च २०१४, 
आमचे एक मित्र सुनील भुतकर कधी रविवारी आमच्याकडे आलेच तर माझ्या पत्नीला विचारात असत,'काय वाहिनी आज "साप्ताहिकीला" काय केले आहे ? "साप्ताहिकी म्हणजे आदल्या दिवशी रात्री केलेला एखादा पदार्थ उरला असेल तर आम्ही त्या शिळ्या पदार्थातून सकाळच्या नाश्त्यासाठी एखादा अफलातून नवा पदार्थ बनवत असू. 
त्यामुळे आजची "साप्ताहिकी' म्हणजेच कालच्या शिळ्या पोळ्यांचा वापर करून आम्ही त्याचे खमंग लाडू केले आहेत. म्हणूनच आजची माझी रेसिपी आहे एका नव्या पदार्थाची ज्याचे नांव आहे ' शिळ्या पोळीचे स्वादिष्ट खमंग लाडू '


साहित्य : चार शिळ्या घडीच्या पोळ्या,पांच चमचे साखर व पांच चमचे किसलेला गूळ,आठ चमचे पातळ साजूक तूप,किसणीवर किसलेले गोटा सुके खोबरे सहा चमचे,अर्धा चमचा विलायची व जायफळपूड,एक चमचा खसखस,अर्धा कप दूध. 
कृती : शिळ्या पोळ्या हाताने किंवा मिक्सरमधून बारीक कुस्करून घ्या,एका कढल्यात किसलेले सुके खोबरे व खसखस भाजून घ्या,गॅसवर एका कढईत तूप घाला व ते तापल्यावर त्यात पोळीचा कुस्करा घालून त्यावर अर्धा कप दूध घाली,मग साखर व किसलेला गूळ घालून लाकडी कलथ्याने मिक्स करून घ्या,त्यावर भाजलेले सुके खोबरे , खसखस व विलायची-जायफळ यांची पूड घालून चांगले मिक्स करून घ्या.मिशन घट्ट झाल्यावर गॅस बंद करून गार होऊ द्या.
गार झाल्यावर तुपाच्या हाताने लाडू वळा. 
चार शिळ्या घडीच्या पोळ्यांचे सुमारे १२ लाडू होतात.




Friday 28 March 2014

कोबीचे मुटके (मुठिया)

कोबीचे मुटके (मुठिया)

साहित्य :  एक वाटी कोबीचा कीस , एक वाटी ज्वारीचे पीठ ,अर्धी वाटी दही ,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , एक चमचा लिंबाचा रस , एक चमचा मिरची-आले – लसूण पेस्ट , एक छोटा चमचा जिरे पूड,एक टेबल स्पून पांढरे तीळ ( भाजून), चिमूटभर खायचा सोडा , चवीनुसार  मीठ व साखर , अर्धी वाटी तेल , फोडणीसाठी हळद , हिंग , जीरे , ८ – १० कढीपत्त्याची पाने ,
कृती : किसलेला कोबी व मुटक्याचे इतर साहित्य एकत्र करुन कडकडीत तेलाचे मोहन घालून मळून घेऊन नंतर मुटके  करुन घ्यावेत व ते वाफवावे. वाफावलेले मुटके तेलात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावेत व कोथिंबीर पेरुन गरम गरम खायला द्यावेत.

Thursday 27 March 2014

उच्च प्रथिनयुक्त सार (डाळींचा प्रकार)

उच्च प्रथिनयुक्त सार (डाळींचा प्रकार)


साहित्य : एक वाटी तांदूळ,अर्धी वाटी मुगाची डाळ,प्रत्येकी पाव वाटी मसूर डाळ,चणा डाळ,उडीद डाळ,प्रत्येकी दोन चमचे धने व जिरे,एक चमचा मेथी,३-४ काळेमिरे,दोन लहान चमचे  सुके खोबरे (किसलेले),१०-१२ सुकलेली कढीपत्याची  पाने,चवीनुसार लाल सुक्या मिरच्या,एक छोटा खडा हिंग
कृती : हिंग सोडून बाकीचे सर्व साहित्य गॅसवर एका कढईत मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्यावे व नंतर ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे व शेवटी न भजता हिंगाची पावडर करावी व त्यात घालून सर्व एकत्र मिसळून घेऊन थंड झाल्यावर एका घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून ठेवावे.
सार कराण्यासाठी साहित्य व कृती :  दोन लाल पिकलेले टोमॅटो व एक कांदा घेऊन घेऊन त्याची प्यूरी करून घ्या,नंतर गॅसवर एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी,जिरे,हळद,हिंग ,ताजी कढीपत्याची पाने, २-३ ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून फोडणी करावी व त्यात ही प्यूरी व एक वाटी पाणी घालून उकळी आल्यावर त्यात चवीसाठी चिंच,गूळ,मीठ, कोथिंबीर व दोन तीन चमचे पूर्वीच  करून ठेवलेली  सार पावडर व आवश्यक तेव्हढे पाणी घालून १० मिनिटे छान उकळू द्या. जरूर वाटल्यास थोडा गोडा मसाला घातला तरी चालेल. 

Tuesday 25 March 2014

कडधान्याचे पराठे

कडधान्याचे पराठे

साहित्य : हिरवे / पिवळे मूग,मटकी,चवळी,मसूर,पांढरा वाटाणा,राजमा अशी सर्व प्रकारची कडधान्ये प्रत्येकी दोन चमचे , आले,लसूण,धने-जिरे पूड प्रत्येकी एक छोटा चमचा,चवीनुसार मीठ,कणीक एक वाटी,ज्वारीचे पीठ अर्धी वाटी,बेसन पीठ पाव वाटी आवश्यकतेनुसार तेल व साजूक तूप.
कृती : पराठे करायच्या आगोदर वरील सर्व कडधान्ये प्रत्येकी दोन चमचे प्रमाणात घेऊन मोड येण्यासाठी दोन दिवस एकत्र पाण्यात भिजत घालावीत, दोन दिवसांनंतर भिजत घातलेली व मोड आलेली सर्व धान्ये एका रोळीत किंवा चाळणीत उपसून निथळत ठेवून एक तासाने एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालून त्यात आले,लसूण,धने-जिरे पूड प्रत्येकी एक छोटा चमचा,चवीनुसार मीठ घालून फिरवून घ्या,एका परातीत एक वाटी कणीक , अर्धी वाटी ज्वारीचे पीठ ,  पाव वाटी बेसन पीठ ,थोडसे मीठ ,तेल व आवश्यकतेनुसार पाणी घालून कणीक मळतो तसे मळून घ्यावे व ताट पालथे घालून झाकून ठेवावे.
अर्ध्या तासाने गॅसवर पराठ्यासाठी तवा तापत ठेवावा व पोळपाटावर पुरणासाठी पोळी लाटतो तसे पराठ्यासाठी लाटून त्यात मिक्सरमधून वाटून घेतलेले सारण भरून (पुराण भरतो तसे) पराठा लाटून घ्यावा व तव्यावर थोडे तेल टाकून तेलावर दोन्ही भाजून घ्या .
 हा मिश्र धान्याचा गरम पराठा त्यावर साजूक तूप घालून लोणचे अगर सॉस बरोबर सर्व्ह करा. 

Sunday 23 March 2014

ओले खोबारे,शेंगदाणे व कोथिंबीर यांची परतून सुकी चटणी

ओले खोबारे,शेंगदाणे व कोथिंबीर यांची परतून सुकी चटणी


नारळ फोडून त्यातील चव खवून काढून झाल्यावर करवंटीच्या आतील भागास न खवलेले जे खोबरे चिकटून शिल्लक राहेलेले असते ते दुसर्‍यादिवशी सुरीने अगर चमच्याने काढून घ्यावे व त्याचाच  उपयोग करुन  छान खमंग अशी चटणी  कशी होते ते मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे.

साहित्य : एक वाटी नारळाच्या करवंटीस आतील बाजूस शिल्लक (न खवलेले) राहिलेले ओले खोबरे (बारीक करून घ्यावे), ५-६ लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे , चवीपुरते चिंचेचे बुटुक ,चमचाभर भाजलेले तीळ , चवीनुसार ४-५ हिरव्या मिराचांचे तुकडे व मीठ आणि साखर , कढीपत्त्याची ४-५ पाने (बारीक चिरून) , फोडणीसाठी तेल , जिरे, मोहोरी , हिंग व हळद .
कृती : गॅसवर एका कढईत फोडणीसाठी दोन चमचे तेल तापत ठेवून तेल तापल्यावर त्यात चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे,लसणाच्या पाकल्याचे तुकडे,जिरे,मोहोरी,हिंग,हळद,कढीपत्त्याची पाने ,तीळ घालून परतवून घ्यावे व मग त्यातच ओले खोबरे घालून पुन्हा एकदा परतावे,मग चवीनुसार साखर व मीठ घालून साखर विरघळेपर्यंत पुन्हा परतत राहावे पाच मिनिटे परतल्यावर गॅस बंद करून , गार झाल्यावर ही चटणी एका काचेच्या बाउल मध्ये काढून ठेवावी.
ही चटणी दोन तीन दिवस छान टिकते. नंतर मात्र सुक्या खोबर्यास व त्यामुळे ह्या चटणीस खवट वास येण्याची शक्यता आहे. 

Saturday 22 March 2014

कच्च्या कैरीचा चुंदा (चटणी)

कच्च्या कैरीचा चुंदा (चटणी)

परवाचे दिवशी आम्ही मंडईत गेलो तेंव्हा कैर्‍या बघून तोंडाला एकदम पाणीच सुटले. मग आम्ही कैर्‍या विकत घेतल्या. काल कैरीची चटणी केली व आज कच्च्या कैरीचा चुंदा (आंबट-गोड चटणी) केली आहे त्याचीच रेसिपी पुढे देत आहे.
साहित्य : एक मोठ्ठी कैरी (किसून) ,चवीनुसार गूळ ,साखर,मीठ व लाल तिखट व फोडणीचे साहित्य तेल,मोहरी.जिरे,हिंग,मेथया दाणे व हळद.  
कृती : विळीवर कैरीची जाड साले काढून टाकावीत व कैरी किसून घ्यावी, एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये कैरीचा कीस घेऊन त्यात चवीनुसार गूळ,साखर मीठ व तिखट घालून चमच्याने चांगले हलवून मिक्स करून तीन-चार तास मुरत ठेवावे. गॅसवर एका काढल्यात तेल तापवून घेऊन मोहरी,जिरे,मेथया दाणे ,हिंग व हळद घालून फोडणी करावी व ती  मुरलेल्या मिश्रणावर घालून पुन्हा एकदा चांगले हलवून घ्यावे.
जेवणात तोंडी लावणे म्हणून हा झटपट होणारा चुंदा कशाबरोबरही फारच चटकदार व चविष्ट लागतो. आठ-दहा दिवस टिकतोसुद्धा ! 

Friday 21 March 2014

पावाचा चिवडा (शिळ्या)

पावाचा चिवडा (शिळ्या)
परवाचे दिवशी आमच्याकडे मटकीची उसळ केली होती. आमच्या नातीच्या आग्रहास्तव काल आम्ही मिसळीचा बेत केला होता.मिसळ करायची म्हणून काल आही मिसळीची तर्री (रस्सा) केली होती. म्हणूनच परवाचे  दिवशी मी तुम्हाला मटकीच्या उसळीची रेसिपी दिली होती, तर काल तर्री (मिसळीचा रस्सा) कशी करायची ह्याची रेसिपी दिली होती. काल मिसळीसाठी पाव आणले होते,त्यातील काही उरले म्हणून आज त्या शिळ्या पावाचा चिवडा करायचे ठरले. त्याचीच रेसिपी मी आज येथे तुमच्यासाठी देत आहे. 

साहित्य :  ४-५ शिळ्या पावाचे स्लाइस,एक माध्यम कांदा,चवीपुरते लाल तिखट किंवा हिरव्या मिरचयांचे तुकडे,मीठ ,साखर व लिंबाचा रस, ८-१० कढीपत्याची पाने फोडणीचे साहित्य म्हणजेच तेल,मोहरी,जिरे,हिंग व हळद ,हवे असल्यास व आवडत असल्यास अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे,स्वादासाठी व सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :  आगोदर शिळ्या पावाच्या स्लाइसचा चरा करून घ्या व कांदा सोलून व चिरून घ्या, गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या ,तेल चांगले तापल्यावर त्यात मोहरी टाका,मोहरी तडतडल्यावर जिरे,हिंग,हळद टाकून परता,मग कांदा व कढीपत्याची पाने टाकून पुन्हा एयकडा चांगले परतून घ्या ,आता आवडत असल्यास भाजलेले शेंगदाणे घालून व शेवटी पावाचा चुरा,मीठ व साखर घाला वर लिंबाचा रस टाकून आणखी एकदा सर्व चांगले परतून मिसळून घ्या ,वर एक ताट झाकण ठेऊन एक वाफ काढा, मग स्वादासाठी बारीक चिरलेली कोठीमिर घालून झाकण ठेऊन गॅस बंद कारा.
पांच मिनिटानंतर झाकण खाधून एकदा झार्‍याने हलवून घेऊन मग डिशमधून हा गरम पावाचा चिवडा सर्व्ह करा. 

Thursday 20 March 2014

मिसळीसाठी कटाचा रस्सा – तर्री


मिसळीसाठी  कटाचा रस्सा – तर्री



तुम्हाला माहितीच असेल की मिसळ ही पूर्णपणे कटावर अवलंबून असते. कट म्हणजेच मिसळीचा रस्सा ! यालाच       " तर्री " असेही म्हणतात. 

मिसळीच्या कटासाठी (रश्यासाठी)लागणारा मसाला : प्रथम एका कढईत सुकया खोबर्याचा कीस आणि तीळ वेगवेगळे कोरडेच (तेल न घालता) भाजून घेऊन ते वेगळ्या ताटात काढून ठेवावे. त्याच कढईत अगदी थोडे तेल घालून त्यात एक वाटी उभा चिरलेला कांदा, आलं - लसूण पेस्ट घालून कांदा गुलाबी होई पर्यंत परतून घेऊन ते भाजलेल्या तीळ व खोबर्‍याच्या ताटातच बाजूला काढून ठेवावे.त्यानंतर कढईत पुन्हा थोडं तेल घालून त्यात अख्खे धणे, आणि सगळा अख्खा गरम मसाला परतावा आणि त्यातच लाल मिरच्या आणि नंतर ओला नारळ घालून आणखी थोडा वेळ परतून घ्यावे.गरम मसाला आणि मिरच्यासाठी तेल कमी लागते.. त्यामुळे त्यातच ओला नारळ परतावा म्हणजे खूप तेलकट नाही होणार. आता भाजलेला हा सगळा मसाला आणि एका टोमॅटोचे मोठे तुकडे करून मिक्सर मधून एकदम बारिक वाटून घ्यावे. हा झाला मसाला.

कट किंवा रस्सा : ह्या कटासाठी जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साधारण अर्धा डाव तेल घालावे. तेल चांगले तापले म्हणजे त्यात प्रथम थोडा बारीक चिरलेला कांदा, कढीपत्याची पाने, हळ्द, हिंग व जिरे  घालावे. कांदा गुलाबी झाला की, त्यात २-४ चमचे कांदा लसूण मसाला घालावा व लगेचच त्यावर २ चमचे साखर घालावी. कांदा लसूण मसाल्याचे प्रमाण चवीनुसार बदलावे. साखर मात्र विसरू नये. तेलातच साखर घातल्याने कमी तेलात तर्री नवाचा प्रकार मिळतो. यात आता वाटलेला सगळा मसाला घालावा आणि थोडा वेळ परतावा. आधीच शिजवून घेतल्याने केवळ टोमॅटो शिजेल इतपतच तो परतावा. मग त्यात गरम पाणी घालावे. अंदाजे ४ कप पाणी घालावे. खूप दाट वाटल्यास आणखी थोडे घालावे. पण खूप पातळ करू नये. आता यात मिठ घालावे आणि चवीनुसार कांदा लसूण मसाला हवा असेल तर घालावा पुन्हा. उकळी आली की गॅस बंद करावा.(फोडणीत साखर घातल्याने तर्री सुंदर येते. आणी निम्मेच तेल लागते. साखरेचा पाक होऊन तो लाल रंग जबरद्स्त दिसतो..

Wednesday 19 March 2014

चटकदार मटकीची उसळ

चटकदार मटकीची उसळ


साहित्य : दोन वाट्या मोड आलेली मटकी, ३-४  मध्यम आकाराचे कांदे, १०-१२लसूण पाकळ्या, बोटभर आल्याचा तुकडा, चवीनुसार तिखट (लाल), मीठ, २ टेबल स्पून गोडा किंवा कांदा-लसूण  मसाला, २ टेबल स्पून किसलेलं सुकं खोबरं, १ टेबल स्पून खसखस, २ मोठे टोमॅटो, मूठभर कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद व हिंग.

कृती : कांदे चिरून त्याच्या मोठ्या फोडी करून त्या थोड्या तेलावर लालसर परतून घ्या. गोटा खोबरे किसून व  भाजून घ्या. मोड आलेली मटकी, थोडेसे मीठ व पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्या देऊन शिजवून घ्यावी. कांदा, खोबरं, लसूण, आलं, लाल तिखट, गोडा मसाला, खसखस, टोमॅटो, थोडी कोथिंबीर मिक्स करून हे जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्यावं. नेहमीप्रमाणे तेलात हिंग ,हळद व मोहरीची फोडणी करून वाटलेला मसाला घालून तो परतावा. चांगले परतल्यावर प्रेशर कुकरमध्ये शिजवलेली मटकी पाण्यासकट त्यात घालावी. १५-२० मिनिटे मंद आचेवर मटकी शिजवून घेतल्यावर त्यात कोथिंबीर घालून झाकण ठेऊन गॅस बंद करावा.


Tuesday 4 March 2014

Monday 3 March 2014

Tarang: कोरिगड (Korigadh)

Tarang: कोरिगड (Korigadh): पाऊस,मुंबई आणि ट्रेक्किंगच नात काहि अजोड आहे. म्हणजे मी काही सर्वे केलेला नाहि पण,पाच पन्नास छोटे मोठे ट्रेक्किंग ग्रुप मुंबई च्या आसपास क...

गाजर रवा खीर

गाजर रवा खीर


साहित्य : ५-६ नग मध्यम आकाराची लालबूंद गाजरे , अर्धी वाटी बारीक रवा , तीन वाट्या साखर, चार चमचे साजूक तूप , दोन चमचे अमूल बटर , दोन चमचे मगज बी , तीन कप दूध , एक चमचा खसखस , एक छोटा चमचा विलायची पूड , एक छोटा चमचा जायफळ पूड , चार केशराच्या काड्या ,काजू व बदामाचे काप
कृती : प्रथम गाजरे धुवून व किसून घ्या , रवा साजूक तुपावर सोनेरी रंगावर भाजून घ्या , गाजराचा कीस व भाजलेला रवा आणि मगज बी मिक्सरमधून फिरवून (वाटून) घ्या , एका नॉन स्टिक भांड्यात साजूक तूप व अमूल बटर गरम करून त्यात गाजर रव्याचे वाटण घालून परतून घ्या व मग दूध घालून शिजवून घ्या, नंतर त्यात साखर,विलायची व जायफळ पूड आणि चमचाभर दुधात चार केशराच्या काड्या खालून घेऊन ते सर्व घाला व पांच मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा, आता त्यात काजू बदामाचे काप घालून  जास्त घट्ट वाटल्यास जरुरीप्रमाणे आणखी थोडे दूध घाला चव बघा , खीर अगोड वाटल्यास हवी तेव्हढी साखर घाला व ढवळून मग काचेच्या बाउल्स मधून खीर सर्व्ह करा. 

Sunday 2 March 2014

पालकाच्या पानांची चटणी

पालकाच्या पानांची चटणी

साहित्य : १० -१५ हिरवीगार रसरशीत ताजी कोवळी पालकाची  देठासकट पाने घ्या, मूठभर कोथिंबीर ,मूठभर शेंगदाणे ,अर्धी वाटी दही, ५-६ लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे, साखर व गूळ (अर्धा अर्धा प्रमाणात) ,मीठ , जिरे, फोडणीसाठी तेल ,हिंग,मोहोरी व लाल तिखट
कृती : प्रथम गॅसवर तवा तापत ठेऊन त्यावर थोडेसे तेल घालून ते पुरेसे तापल्यावर  त्यावर पालकाची पाने, जिरे, हिरव्या मिरचयांचे तुकडे,कोथिंबीर, शेंगदाणे व लसणाच्या पाकळ्या घालून सर्व साहित्य चांगले खरपूस परतून घ्या, परतून झाल्यावर गॅस बंद न करता लगेच  त्यात दही, गूळ व साखर ,मीठ  घालून पुन्हा परतून घ्या व मगच गॅस बंद करा.मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून हवे तसे फिरवून वाटून घ्या  व चटणी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घ्या,गॅसवर एका कढल्यात फोडणीसाठी दोन चमचे तेल तापवू घेऊन पुरेसे चांगले तापल्यावर त्यात मोहोरी,जिरे व हिंग घाला,गॅस लगेच बंद न करता फोडणी गरम असतांनाच त्यात दोन चमचे दही घाला, बाउल मधील चटणीवर एक छोटा चमचा लाल तिखट घालू लगेचच त्यावर ही गरम फोडणी घालून छानले एकजीव होईपर्यंत कालवून घ्या.
झाली ही तुमची चटकदार,खमंग अशी पालकाच्या पानांची चटणी खाण्यासाठी तय्यार !!!
जेवणात पोळीबरोबर डावीकडचे तोंडीलावणे म्हणून ही चटकदार,खमंग पालकाच्या पानांची चटणी फारच उत्तम ! 

Saturday 1 March 2014

शेंगदाण्याची आमटी

शेंगदाण्याची आमटी



साहित्य :   १२५ ग्राम शेंगदाणे , चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे,मीठ,साखर व आसुल किंवा चिंच ,फोडणीसाठी साजूक तूप किंवा रिफाईंड तेल व जिरे.
कृती :  प्रथम शेंगदाणे भाजून व साले काढून घ्या,मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे,चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे,मीठ,साखर व आमसुले किंवा चिंच  एकत्र  घेऊन पाणी घालून फिरवून घ्या ,गॅसवर एक स्टीलचा मोठा उभा गंज  किंवा पातेले साजूक तूप किंवा रिफाईंड तेल घालून तापत ठेवा,त्यात जिरे घालून फोडणी करून घ्या व मग त्या फोडणीत मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले मिश्रण घाला व चांगले उकळू द्या.
झाली ही उपासाची शेंगदाण्याची आमटी तय्यार.
भगर किंवा साबुदाणा खिचडी बरोबर ही सर्व्ह करा. सर्व करतेवेळी गरम आमतीवर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.