Friday, 11 October 2013

“ मोड आलेल्या मुगाची उसळ “

मोड आलेल्या मुगाची उसळ “साहित्य: 
३/४ कप मुग 
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने 
२- ३ मोठ्या लसणीच्या पाकळ्या, जराशा ठेचून 
१/४ कप बारीक चिरलेला कांदा 
१/४ कप ताजा खोवलेला नारळ 
२ ते ३ आमसूलं 
१/२ टीस्पून गोड मसाला (ऐच्छिक) 
चवीपुरते मीठ 
१/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार 

कृती: 
१) मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. नंतर सकाळी पाणी काढून टाकावे. मूग निवडून घ्यावे, जर खडा किंवा न भिजलेला कडक मूग असेल तर काढून टाकावा. सुती कापडात भिजलेले मूग घट्ट बांधून ठेवावे. मोड यायला साधारण १० तास तरी लागतील. आणि जर थंडीचा सिझन असेल तर अजून काही तास लागतील. मुगाला मोड आले कि उसळ बनवायच्या आधी पाण्यात घालून लगेच उपसावेत. यामुळे मूग थोडे ओलसर होतात आणि फोडणीला टाकल्यावर कोरडे राहत नाहीत. आणि करपण्याचा संभव टळतो. 
२) कढईत तेल गरम करून. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लसूण आणि कांदा नीट परतून घ्यावा. 
३) कांदा छान परतला कि मूग घालून परतावे. आमसूल, मीठ घालावे आणि नीट मिक्स करावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी. मूग कोरडे पडू देवू नये. यासाठी मध्येमध्ये पाण्याचा हबका मारावा. एकाचवेळी खूप जास्त पाणी घालू नये. त्यामुळे चव बिघडते. मूग शिजायला १५ ते २० मिनिटे लागतील. 
४) मूग साधारण ९०% शिजले कि त्यात नारळ, लागल्यास मीठ आणि गोड मसाला घालावा. उसळीला थोडा रस ठेवायचा असल्यास गरजेपुरते पाणी घालावे. साखर घालून उकळी काढावी. 
गरम उसळ पोळीबरोबर सर्व्ह करावी. 

टीप: 
१) मुगाची उसळ कांदा आणि लसणीशिवाय सुद्धा करता येईल. पण, मुग आणि कांदा-लसूण यांचे कॉम्बिनेशन खूप छान लागते. 
२) मी शक्यतो कोणताही मसाला (गोड/गरम) मुगाच्या उसळीला वापरत नाही. वापरल्यास अगदी थोडासा वापरते. पण आपल्या आवडीनुसार मसाल्याचा वापर करावा.

No comments:

Post a Comment