Wednesday 31 July 2013

शंकरपाळी



साहित्य : १ वाटी चाळलेला मैदा , १ वाटी चाळलेली कणीक , १वाटी दूध , १/२ वाटी पाणी , १/२ वाटी लोणी , १/२ वाटी साखर , ३-४ मोठे चमचे तांदळाची पिठी , चिमूटभर खाण्याचा सोडा व चिमूटभर मीठ , तळण्यासाठी रिफाईंड तेल
कृती : एका भांड्यात १वाटी दूध व १/२ वाटी पाणी एकत्र करून मिश्रण चांगले ढवळा व बाजूला ठेवा.
 १/२ वाटी लोणी व १/२ वाटी साखर एकत्र करून मिश्रण चांगले फेटून घ्या ते हलके व फुगल्यावर त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा व चिमूटभर मीठ घालून पुन्हा एकदा चांगले फेटून घ्या व नंतर त्यात १ वाटी चाळलेला मैदा , १ वाटी चाळलेली कणीक , ३-४ मोठे चमचे तांदळाची पिठी व एकत्र केलेले दूध व पाणी घाला व चांगले मळून घ्या.
त्याचे सारख्या आकाराचे ३-४ गोळे करून ठेवा व नंतर एकेक गोळा जाडसर पोळीप्रमाणे लाटून कातण्याने शंकरपाळी कापून घ्या व ती शंकरपाळी उकलत्या तेलात/तुपात सोनेरी रंगावर तळून घ्या. गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.



Tuesday 30 July 2013

पाणीपुरी,बटाटापुरी,दहिपुरी,शेवपुरी,रगडापुरी,आलू चाट







पाणीपुरी

साहित्य व प्रमाण : पुदिना १ ते २ जुडया.कोथिंबीर १ जुडी,हिरव्या मिरच्या ४ ते ५,आले एक तुकडा,कढीपत्ता ५/६ पाने, खजूर २५० ग्राम,चिंच  २५० ग्राम,गूळ २५० ग्राम, छोले/काबुली चणे २५० ग्राम,पांढरा वाटाणा २५० ग्राम,धने व जिरे पावडर (प्रत्येकी १ मोठा कोशिंबीरीचा चमचाभर),शेंदेलोण व पादेलोण (प्रत्येकी १ चमचा),पाणीपुरी तयार मसाला १०० ग्राम,चाट मसाला १०० ग्राम,काळे मिरे २/३,लाल तिखट १ चमचा, मीठ १ चमचा,साखर २ मोठे चमचे, बारीक शेव ५०० ग्राम,मध्यम आकाराचे बटाटे ७/८,गोड दही ५०० ग्राम,फुगलेल्या व कडक चपट्या पाणीपुरी व रगडापुरीच्या तयार पुर्‍या (सरसकट माणशी १५ नग प्रमाणे)    
पाणीपुरीचे पाणी तयार करण्याची कृती : चिंच व खजूर (बिया काढून)आणि गूळ किमान ५ ते ६ तास पाण्यात भिजत घालून ठेवावेत व नंतर मिक्सर मधून फिरवून व गाळून घ्यावे. पांढरा वाटाणा व छोले/काबुली चणे ४ / ५ तास पाण्यात भिजत घालून नंतर ते शिजवून व बटाटे उकडून घ्यावेत.पुदिना निवडून व स्वच्छ धुवून घ्यावा व मिक्सर मधून फिरवून व पाणी घालून गाळून घ्यावा. एका मोठ्या पातेल्यात मिक्सरमधून फिरवून व नंतर गाळून घेतलेले चिंच,खजूर,गूळ व पुदिना ह्याचे पाणी एकत्र करावे व त्यात चवीप्रमाणे वाटलेले आले,हिरवी मिरची,पाणीपुरी मसाला,चाट मसाला,मिरेपूड,जिरे व धने पावडर,लाल तिखट,शेंदेलोण,पादेलोण,मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर,बारीक चिरलेला कढीपत्ता,साखर (चवीसाठी) इ. घालून मिश्रण चांगले ढवळत राहावे.    
आलू चाट
साहित्य : -उकडलेले माध्यम आकाराचे बटाटे, १ कांदा, १ टोमॅटो, १ लिंबू, चाट मसाला,तिखट- साखर-मीठ चवीनुसार,चिंचेची चटणी,बारीक शेव,बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : उकडलेल्या बटाटयाच्या मध्यम फोडी कराव्यात. कांदा व टोमॅटो चिरुन घ्यावेत. मोठया बाऊलमध्ये सर्व एकत्र करावे, चवीनुसार चाट मसाला, तिखट,मीठ, साखर घालून लिंबू पिळून चांगले कालवावे. वर चिंचेची आंबट-गोड चटणी व बारीक्षेव आणी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फ्रीजमध्ये थोडावेळ थंड करायला ठेवून मग खायला घ्यावे.


 

-





Monday 29 July 2013

मेथी मलई मटर पनीर



साहित्य : २ कोवळ्या ताज्या मेथीच्या जुडया(निवडून,स्वच्छ धुवून व चिरून),१०० ग्राम खवा,२०० ग्राम फ्रेश क्रीम,१ कप दूध,२०० ग्राम हिरवा मटार,१०० गाम पनीरचे छोटे छोटे तुकडे २ मोठे कांदे (बारीक चिरून),१ मोठा चमचा टोमॅटो प्यूरी,छोटा अर्धा चमचा गरम मसाला, छोटा अर्धा चमचा हळद,२ मोठे चमचे तेल,चवीनुसार मीठ
कृती : ओला हिरवा मटार व बारीक चिरलेली मेथी सळसळत्या उकळत्या पाण्यात २ मिनिटे घालून उपसून घ्या. एका कढईत तेल घालून गॅसवर ठेवा व त्यात बारीक चिरलेला कांदा घाला व सोनेरी गुलाबी रंगावर परतून घ्या नंतर त्यात हळद घालून हलवा,मग त्यात प्रथम मटार घालून हलवा व नंतर खवा कुस्करून घाला व हलवा ,नंतर टोमॅटो प्युरी घालून हलवा व अखेरीस दूध घाला व शिजवत ठेवा. १-२ उकळ्या येऊन गेल्यावर त्यात उकळत्या पाण्यातून काढून घेतलेली मेथी घालून २-३ मिनिटे शिजवूत घेतल्यावर गरम मसाला घालून हलवा व कढई खाली उतरवून ५ मिनिटे झाकून ठेवा॰

सर्व्ह करतेवेळी फेटलेले फ्रेश क्रीम घालून सर्व्ह करा. 

एराप्पे


साहित्य : २ वाट्या उकडे तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ,मोठा कांदा बारीक चिरून , १ मोठा आल्याचा तुकडा बारीक चिरून, आवडीनुसार ३ -४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग व बारीक चिरलेला कढीपत्ता 
कृती : प्रथम २ वाट्या उकडे तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ वेगवेगळे १०-१२ तास भिजवणे. मग दोन्ही वेगवेगळे वाटून स्टीलच्या मोठ्या पातेल्यात एकत्र करून उबदार ठिकाणी पीठ फुगण्यासाठी / आंबवण्यासाठी १०-१२ तास झाकून ठेवावे.




दुसरे दिवशी तयार इडली पीठात बारीक चिरलेला कांदा, आले, हिरवी मिरची व चवीनुसार मीठ घालावे.` एका काढलीत तेल तापवून मोहरी, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करावी व ती पीठावर ओतून मिश्रण नीट एकजीव करावे.निर्लेपचे आप्पेपात्र मध्यम आचेवर गॅसवर ठेवून त्यात १/२ चमचा  तेल घालावे. तेल तापले की त्यात चमच्याने मिश्रण घालावे. झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्यावे. एका बाजूने शिजून फुगले की उलटवून दुसर्‍या बाजूने शिजू द्यावे. तयार आप्पे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.


झटपट सोलकढी

साहित्य : घट्ट दही,दूध,पाणी,कोकण आगळ,साखर,मीठ,आले,मिरच्या,कोथिंबीर,४-५ कढीपत्याची पाने,धने-जिरे पूड,स्ट्रौबेरी खाण्याचा रंग   
कृती : प्रथम मिक्सरच्या द्रव पदार्थासाठीच्या भांड्यात १मोठा कप घट्ट दही,१-१/२ते २ कप दूध,१/२ कप कोकण आगळ व पाणी,चवीप्रमाणे साखर व मीठ घालून फिरवून घ्या व एका मोठ्या स्टीलच्या उभ्या आकाराच्या गंजात काढून नंतर त्यात मिक्सरच्या छोट्या भांड्यातून आल्याचा एक छोटा तुकडा,लसणाच्या ४-५ पाकळ्या,चवीप्रमाणे २-३ मिरच्या,धने-जिरे पावडर,थोडी चिरलेली कोथिंबीर व ४-५ कढीपत्याची पाने ह्यांचे वाटण करून घेऊन ते वाटण आणी ५-६ थेंब स्ट्रौबेरी खाण्याचा रंग घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या व काचेच्या ग्लासमधून सर्व्ह करतेवेळी सजावटीसाठी वरुण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.