Sunday 11 March 2012

दोडक्यांच्या शिरांची चटणी

दोडक्यांच्या शिरांची चटणी

साहित्य : कोवळे दोडके २५० ग्राम,पांढरे तीळ व शेंगदाण्याचे कूट प्रत्येकी दोन मोठे (कोशिंबीरीचे) चमचे,मीठ,साखर व लाल तिखट चवीपुरते,कढीपत्ता ५-६ पाने,थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर,१०-१२ थेंब लिंबाचा रस,गोडे तेल,हळद,हिंग व मोहोरी इ.फोडणीचे साहित्य
कृती : प्रथम किसणीवर कोवळा गोड दोडका किसून घेऊन दोडक्याच्या शिरा काढून घ्याव्यात व एका ताटात पसरून ठेऊन उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात.  निर्लेपचे फ्राय पॅनमध्ये फोडणीसाठी गोडे तेल घेऊन गॅसवर तापत ठेवावे.तेल चांगले कडकडीत तापल्यावरच त्यात मोहोरी,हिंग,हळद,कढीपत्त्याची पाने,बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यानंतर वाळवलेल्या दोडक्याच्या शिरा,चवीपुरते लाल तिखट,मीठ,साखर,पांढरे तीळ व शेंगदाण्याचे कूट घालावे व चांगले परतून घ्यावे.नंतर ते गरम असतानाच त्यावर लिंबाच्या रसचे १०-१२ थेंब टाकून हालवून घ्यावे.तयार चटणीवर पुन्हा एकदा थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर व चिमूटभर साखर घालून हलवावी व सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून ठेवावी.ही चटणी अत्यंत रुचकर व चविष्ट लागते.   

Wednesday 15 February 2012


मावळी काकडीचे थालीपीठ





साहित्य : एका मोठ्या  मावळी काकडीचा कीस , त्यात मावेल तेव्हढे ज्वारीचे पीठ चवीपुरते लाल तिखटमीठहळदहिंग व थालीपीठ लावण्यासाठी तेल 
कृती : एका मोठ्या  परातीत मावळी काकडीचा कीस घेऊन त्यात चवीनुसार लाल तिखटमीठ व थोडीशी हळद आणि हिंग घालून अर्धा तास झाकून ठेवा. मीठामुळे काकडीला चांगले पाणी सुटेल॰ अर्ध्या तासाने काकडीला चांगले पाणी सुटल्यावर त्या पाण्यात मावेल इतपतच ज्वारीचे पीठ घालून भाकरीला मळतो तसे पीठ मळून घट्ट गोळा बनवा. आता तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर पिठाचा मध्यम गोळा ठेऊन हातानेच भाकरीप्रमाणे व त्या आकारात सारख्या जाडीने थापा. बोटाने मध्यभागी एक व कडेने गोलाकार तीन अशी भोके पाडा व चमच्याने त्या प्रत्येक भोकात थोडेसे तेल सोडा. नंतर झाकण ठेवून तवा गॅसवर ठेवा.  ४-५ मिनिटांनी झाकण काढा व उलथण्याने थालीपीठ तव्यावर उलटे करा व दुसर्‍या बाजूने २-३ मिनिटे ठेवा. तांबूस रंग आल्यावर गरम थालीपीठ एका डिशमध्ये घेऊन सॉसगोड दहीलसणाची चटणीखाराच्या मिरच्या अगर लोणच्याबरोबर खायला द्या.  

Thursday 5 January 2012


भाजणीचे थालीपीठ


 भाजणीचे साहित्य : थालीपीठाच्या भाजणी पीठाचे साहित्य व विविध धान्यांचे प्रमाण -- ज्वारी १ किलो,बाजरी १-१/२किलो, मुग डाळ २० ग्रॅम,उडीदडाळ २० ग्रॅम, चणाडाळ ३०० ग्रॅम, अख्खी चवळी २० ग्रॅम, मटकी२० ग्रॅम, तांदुळ ३०० ग्रॅम, गहु २० ग्रॅम ,साल काढलेले सोयाबिन २० ग्रॅम. धने२५ ग्रॅम. जिरे ५० ग्रॅम. १च.चमचा मिरीचे दाणे. सर्व धान्ये/पदार्थ वेगवेगळे स्वतंत्रपणे मंद आचेवर खरपुस भाजूघ्यावेत व गार झाल्यावर एकत्र करुन भरड दळावी
थालीपीठ साहित्य व कृती : थालीपीठ करतेवेळी भाजणीमध्ये कांदा,लसूण,कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,हिंग व पानी घालून घोळे करून घ्यावेत व तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर भाकरीप्रमाणे थालिपीठ तापावे व बोटाने मध्यभागी एक व बाजूला तीन भोके पाडावीत व त्यात चमच्याने थोडे थोडे तेल सोडावे व गॅसवर ठेववे काही वेळानंतर थालीपीठ उलटावे व दुसर्‍या बाजूने भाजून घ्यावे.

भाजणीचे गरमागरम थालीपीठ एका डिशमध्ये घेऊन त्यावर लोण्याचा गोळा किंवा साजूक तूप घालून कैरीचे लोणचे / खाराच्या मिरच्या किंवा गोड दहयासोबत खाण्यास द्यावे.